Iran Israel War : इराण-इस्रायलमधील (Iran Israel War ) वाढत्या तणावाचा परिणाम आखाती देशांतील विमान सेवांवर झाला असून अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. याचा फटका भारतीय प्रवाशांनाही बसला आहे. जालना जिल्ह्याचे काँग्रेस खासदार डॉ. कल्याण काळे हेही दुबईत अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. कल्याण काळे २७ फेब्रुवारी रोजी कुटुंबासह खासगी सहलीसाठी दुबई येथे गेले होते. दरम्यान, मध्यपूर्वेतील तणाव वाढल्यानंतर अनेक विमानसेवा तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या. त्यामुळे त्यांचे भारतात परतण्याचे नियोजित उड्डाण रद्द झाले असून ते सध्या दुबईतच थांबले आहेत.( Iran Israel War ) खासदार काळे यांच्या सुरक्षेबाबत जालन्यात चिंतेचे वातावरण होते. मात्र त्यांचे बंधू भाऊसाहेब काळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, डॉ. काळे आणि त्यांचे कुटुंबीय पूर्णपणे सुरक्षित आहेत. विमान सेवा सुरळीत झाल्यानंतर ते मायदेशी परततील, अशी माहिती त्यांनी दिली. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, डॉ. काळे यांच्यासह जालना जिल्ह्यातील आणखी आठ नागरिक दुबईत अडकले आहेत. युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांतील विमानतळांवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. प्रशासनाकडून या नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवण्यात येत असून परिस्थिती पूर्ववत होताच त्यांच्या परतीची व्यवस्था केली जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, मध्यपूर्वेतील तणावामुळे आंतरराष्ट्रीय प्रवासावर मोठा परिणाम झाला असून परदेशात असलेल्या भारतीय नागरिकांना स्थानिक प्रशासन व भारतीय दूतावासाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.