नवी दिल्ली – मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये आणखी तीन चित्त्यांना संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे. पवन नावाच्या चित्त्याला दोन दिवसांपूर्वी बेशुद्ध करून त्याच्यावर उपचार करण्यात आले आहेत. तर इतर दोन चित्ते जंगलात असून, त्यांना अद्याप पकडलेले नाही.
कुनो नॅशनव पार्कचे डीएफओ (विभागीय वन अधिकारी) प्रकाश वर्मा यांनी सांगितले की, पवनच्या मानेवर झालेल्या जखमेमुळे त्याला संसर्ग झाला आहे. दुसरीकडे, कुनो नॅशनल पार्कचे सीसीएफ उत्तम शर्मा यांनी चित्त्यांना संसर्ग झाल्याच्या बातम्या दिशाभूल करणाऱ्या असल्याचे म्हटले आहे. तसे काही नसून तसे असेल तर माहिती दिली जाईल, असे ते म्हणाले.
अधिक माहितीनुसार, पवनसह 3 चित्ते रेडिओ कॉलर किंवा परस्पर संघर्षामुळे जखमी झाले आहेत. जखमेत संसर्ग झाल्याचेही म्हटले जात आहे. उशिरा ही माहिती मिळाल्याने तत्काळ उपचार होऊ शकले नाही. त्यामुळे संसर्ग वाढल्याची माहिती आहे.