Bihar Election: ‘ज्यांचा जन्म भारतात झाला नाही त्यांना मतदानाचा अधिकार नाही’: SIRवर शाह यांचे उत्तर; म्हणाले- बिहारमध्ये स्पष्ट बहुमताने एनडीए सरकार स्थापन होतंय

सीतामढी : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी शुक्रवारी सीतामढी येथे माता जानकी मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पाडला. यावेळी उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी उपस्थित होते. या कार्यक्रमात अमित शाह यांनी SIR (Special Intensive Revision) मतदार यादीच्या पुनरावलोकनाची विशेष प्रक्रिया आणि ऑपरेशन सिंदूर यावर भाष्य करत लालू प्रसाद यादव आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच बिहारात राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) स्पष्ट बहुमताने सरकार स्थापन करणार असल्याचे सांगितले.
‘घुसखोर हे लालू-राहुल यांचे मतपेढी’ –
SIR वर बोलताना अमित शाह म्हणाले, “ज्याचा जन्म भारतात झाला नाही, त्याला मतदानाचा अधिकार नाही. घुसखोर हे लालू आणि राहुल यांचे मतपेढी आहेत, म्हणूनच त्यांना याची चिंता आहे. बिहारातील जनता घुसखोरांना सहन करणार नाही. लालूजी, तुम्ही कोणाला वाचवू इच्छिता? बांगलादेशातून येऊन बिहारातील लोकांच्या नोकऱ्या हिसकावणाऱ्यांना का वाचवता? राहुल गांधी निवडणुकीत पराभव झाल्याने अशा सबबी सांगतात.”
‘पाकिस्तानात घुसून मारले’
ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करताना शाह म्हणाले, “काँग्रेसच्या काळात बॉम्बस्फोट करणारे पळून जात. कोणी विचारणा करणार नव्हते. आमच्या सरकारने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. पाकिस्तानात घुसून कारवाई केली. लालू आणि त्यांच्या पक्षाला यावर प्रश्न उपस्थित करायचे आहेत. ही नरेंद्र मोदींची आणि NDA ची सरकार आहे. देशाशी खेळण्याचा कोणालाही अधिकार नाही.”
माँ जानकी की जय!
बिहार के सीतामढ़ी में माता सीता की जन्मस्थली पर पुनौराधाम मंदिर एवं परिसर के समग्र विकास की वृहद योजना के भूमि पूजन से लाइव…#माँ_जानकी_मंदिर https://t.co/8uFr1Emg73— Amit Shah (@AmitShah) August 8, 2025
‘लालूंनी मिथिलेला काय दिले?’
लालू प्रसाद यांच्या पक्षाने गुरुवारी पत्रकार परिषदेत अमित शाह यांनी मिथिलेसाठी काय केले, असा सवाल उपस्थित केला होता. याला उत्तर देताना शाह म्हणाले, “मी बनियाचा मुलगा आहे, आणा-पैशाचा हिशेब घेऊन आलो आहे. लालू रेल्वेमंत्री असताना रेल्वेसाठी दरवर्षी 1,132 कोटी रुपये खर्च करत होते. मोदीजींनी 2025-26 साठी रेल्वेसाठी 10,066 कोटींचे बजट ठेवले आहे.”
माता जानकी मंदिराचे भव्य भूमिपूजन –
मूसळधार पावसातही अमित शाह यांनी माता जानकी मंदिराची पहिली विट रचली. मंदिराला फुलांनी सजवण्यात आले होते. भूमिपूजनासाठी 21 तीर्थस्थानांची माती आणि 11 नद्यांचे पाणी आणले गेले. अयोध्येच्या हनुमान गढीतूनही विट आणली गेली. 50 एकरात 882 कोटी रुपये खर्चून हे भव्य मंदिर बांधले जाणार आहे. राजस्थानातील खास बलुआ दगडाने मंदिराची निर्मिती होईल. मंदिराची उंची 156 फूट असेल, जी अयोध्येतील राम मंदिरापेक्षा 5 फूट कमी आहे.
अमृत भारत ट्रेनला हिरवा झेंडा –
अमित शाह यांनी समस्तीपुर ते दिल्ली दरम्यान धावणाऱ्या अमृत भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अयोध्येतील पूजेची छायाचित्रेही दाखवण्यात आली.
नीतीश कुमारांचे वक्तव्य –
मुख्यमंत्री नीतीश कुमार म्हणाले, “आम्ही आता जनतेला मोफत वीज देणार आहोत. मी सर्व जिल्ह्यांना भेटी देऊन तपासणी केली आहे. जिथे कमतरता आहे, ती पूर्ण करू. 430 नवीन योजनांना मंजुरी देण्यात आली असून, त्यासाठी 50 हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. केंद्र सरकारने बजटमध्ये बिहारची काळजी घेतली आहे. पूरग्रस्त भागासाठीही मदत दिली गेली आहे.”
बिहारमधील SIR (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हीजन) प्रकरण काय आहे?
बिहारमध्ये सध्या सुरू असलेले SIR (Special Intensive Revision) हे निवडणूक आयोगाद्वारे मतदार यादीच्या पुनरावलोकनाची विशेष प्रक्रिया आहे. या प्रक्रियेचा उद्देश मतदार यादीतील बनावट, मृत, स्थलांतरित किंवा डुप्लिकेट मतदारांची नावे काढून टाकणे आणि मतदार यादी स्वच्छ व पारदर्शी करणे हा आहे. ही प्रक्रिया बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी 24 जून 2025 रोजी सुरू झाली आणि यामुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे.
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी, सुप्रिया श्रीनेट आणि राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव यांनी SIR ला भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि निवडणूक आयोगाच्या संगनमताने रचलेला कट म्हटले आहे. त्यांचा दावा आहे की, या प्रक्रियेद्वारे विशेषतः अल्पसंख्याक, गरीब आणि भाजपला मत न देणाऱ्या मतदारांची नावे मतदार यादीतून हटवली जात आहेत.





