नीतीश कुमार यांना व्यक्तिगत नाही, तर त्यांच्या धोरणांना विरोध- चिराग

पाटणा – अगोदर बिहार विधानसभा आणि त्यानंतर पक्षच हातातून गेल्यावरही चिराग पासवान नाउमेद झालेले नाही. आपले लक्ष्य आता आशीर्वाद यात्रेवर असल्याचे सांगत त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या धोरणांवर टीका केली.

नीतीश यांनी माझ्या पित्यासोबत काम केले असल्यामुळे ते मला पित्यासमान आहेत. त्यांच्या विषयी व्यक्तीगत काहीच नाही. मात्र त्यांच्या धोरणांना आपला विरोध असल्याचेही खासदार चिराग पासवान यांनी स्पष्ट केले.

चिराग म्हणाले, जनतेच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने आपण एक पूल म्हणून काम करण्याचा प्रयत्न केला. तेही नीतीश यांच्यासोबत असताना. मात्र त्यांनी त्यावेळीही कधी आपल्या भूमिकांकडे लक्ष दिले नाही. त्यांची सगळ्यांत मोठी समस्या ही आहे की ते घराबाहेर पडत नाहीत. पडतात तर केवळ हवाई पाहणी करून परतात. ते शेवटचे घराबाहेर कधी पडले होते हे त्यांनाही आता आठवत नसेल.

बिहारच्या दारूबंदीबाबत बोलताना चिराग म्हणाले की अगोदर सगळ्या गावांत दारूची दुकाने सुरू करण्यात आली. नंतर बंदी घालण्यात आली. मात्र आजही ती सगळीकडे मिळवते अगदी होम डिलिव्हरीसुध्दा सुरू आहे.

सगळ्यांना याची माहिती आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनाच त्याची कल्पना नाही. सगळीकडे गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत जो जनादेश प्राप्त झाला तो नीतीश यांच्यासाठी नव्हता आणि याची त्यांनाही कल्पना आहे.

लालूप्रसाद यादव यांचे पुत्र आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्याबाबत बोलताना चिराग म्हणाले की त्यांच्या आणि माझ्या वडिलांनी सोबत काम केले आहे. त्यामुळे तेजस्वी मला लहान भावासारखे आहेत. मात्र सोबत काम करण्याबाबत अद्याप कोणती बोलणी झालेली नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.