Mamata Banerjee : तुम्ही मला हरवू शकत नाही; ममता बॅनर्जी यांचे भाजपला आव्हान

पश्चिम बंगाल : मी एक वाघीण आहे आणि कोणीही मला जखमी करण्याचा प्रयत्न करू नये. मला धोकादायक बनू देण्याचा प्रयत्न पण करु नये. त्यामुळेच मी तुम्हाला परवानगी दिल्याशिवाय तुम्ही मला कोणत्याही निवडणुकीत हरवू शकत नाही, अशा शब्दांत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अप्रत्यक्षपणे भाजपावर टीका केली. निवडणूक आयोगाने ममता सरकारला दोन निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांसह (ईआरओ) चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे निर्देश दिल्यानंतर बॅनर्जी यांचे हे विधान आले. यावर नाराजी व्यक्त करत त्यांनी आयोगावर राजकीय पक्षपाताचा आरोप केला.
झारग्राममधील पंचमाथा मोरे येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना बॅनर्जी म्हणाल्या की, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने माझ्यावर गोळीबार केला होता. मी त्यामधून वाचले आहे. माझे डोके फोडण्यात आले होते, माझे शरीर रक्ताने माखले होते. पण मला भीती वाटत नाही. मी एक जिवंत वाघीण आहे. मला जखमी करण्याचा प्रयत्न करू नका. माझी लढाई अजून संपलेली नाही. बॅनर्जी म्हणाल्या, निवडणूक आयोग केंद्रीय गृहमंत्री अमित शहायांच्या एजंटसारखे काम करत आहे. बंगाल हा अपमान सहन करणार नाही. मतदारांनी मतदार यादीतील त्यांची नावे तपासावीत आणि सतर्क रहावे. मतदार यादीतील तुमचे नाव ही तुमची ओळख आहे. आत्ताच नोंदणी करा आणि नंतर पुन्हा तपासा. निवडणुकीच्या दिवशी तुमचे नाव गहाळ झाल्याचे पाहून आश्चर्यचकित होऊ नका.
भाषिक अस्मिता जपली
बंगाली भाषिकांविरुद्ध पूर्वग्रह निर्माण करण्याच्या प्रयत्नांवर टीका करताना ममता म्हणाल्या, आता, जर तुम्ही बंगाली बोलत असाल तर तुम्हाला बांगलादेशी किंवा रोहिंग्या म्हटले जाते. हा बंगाली भाषेवर हल्ला आहे. जय बांगला म्हणा आणि प्रतिकार करा. आम्ही लढल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही. तुमचे मतदार कार्ड हे फक्त एक कार्ड नाही – ते तुमच्या ओळखीचा पुरावा आहे. सरकार जनतेसाठी काम करते. तुमची सुरक्षा सुनिश्चित करणे ही माझी जबाबदारी आहे. ते तुम्हाला धमकावण्याचा प्रयत्न करतील, परंतु यशस्वी होणार नाहीत. मी बंगाल निवडणुकीच्या नावाखाली छळ होऊ देणार नाही.





