चंद्रपूर – संपूर्ण देशभर उन्हाचा तडाखा वाढत चालला आहे. याची झळ जंगलातील प्राण्यांनाही सोसावी लागत आहे.
उन्हाच्या तडाखान्याने शहरातील रस्ते सुनसान होत आहेत तर जंगलातील प्राणी देखील पाणवठ्याच्या आश्रय घेत आहेत. ताडोबातील जंगलात याचा प्रत्यय पाहायला मिळाला.
डॉ. विवेक शिंदे (भद्रावती, जिल्हा चंद्रपूर) या पर्यटकाने ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर झोनमधील कोलारा गेटमध्ये जंगलातील पाणवठ्यात पट्टेदार वाघ पाण्यात बसून आनंद घेत असल्याची छायाचित्रं कॅमेरात कैद केली.
एरवी जंगल सफारीला गेल्यावरअनेकदा वाघ आडवा आल्याचे व्हिडीओ किंवा फोटो पाहायला मिळतात. परंतु वाघाचे हे पाण्यातील रूप काहीसे वेगळेच आहे.
पाण्यात वाघाला डुबक्या मारताना पाहून उन्हाची तीव्रता किती असेल हे वेगळं सांगण्याची आवश्यकता वाटत नाही. वाघाचे हे पाण्यातील रौद्र रूप पाहण्यासारखे आहे. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होत आहेत.