विश्रांतवाडी – भविष्यातले विचारवंत,कलाकार, लेखक, तत्त्वज्ञ, पुढारी, डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनीयर, शास्त्रज्ञ तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असते. ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देऊन त्यापासून एखादी प्रतिकृती अथवा मूर्ती तयार करत असतो,
अगदी त्याप्रमाणेच शिक्षक हे प्रत्येकाच्या मनावर योग्य संस्कार करून भविष्यातील जबाबदार नागरिक घडवीत असतात. त्यामुळे देशाच्या जडणघडणीत त्यांचे कार्य महान आहे, असे गौरवोद्गार आमदार सुनील टिंगरे यांनी काढले.
धानोरीतील जाणता राजा प्रतिष्ठाण व शशिआण्णा टिंगरे सोशल फाऊंडेशन यांच्यावतीने शिक्षकदिनानिमित्त विविध शिक्षण संस्थेतील शिक्षकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी आमदार टिंगरे बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे वडगावशेरी मतदारसंघाचे अध्यक्ष ऍड.नानासाहेब नलावडे, महिला अध्यक्षा नीताताई गलांडे, अर्जुन टिंगरे, बाबुराव टिंगरे, अनिल टिंगरे, बाळासाहेब टिंगरे, अरुण कानसकर, शांताराम टिंगरे, कुलदीप शर्मा, धनंजय टिंगरे, किशोर बाराथे,
अजित परांडे, प्रताप टिंगरे, विकास टिंगरे, नितीन टिंगरे, किशोर टिंगरे, शांताराम खलसे, महेश परांडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत यशवंतराव टिंगरे यांनी केले होते.
शिक्षक हे आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान शिकवत नाहीत, तर आपण त्यांच्याकडून जगण्याची कला आत्मसात करत असतो. त्यामुळे त्यांचा आदरपूर्वक सन्मान केला पाहिजे.
त्यांच्याविषयी शिक्षक दिनी कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला असल्याचे कार्यक्रमाचे संयोजक शशिकांत यशवंतराव टिंगरे म्हणाले.