राजगुरूनगर, {प्रतिनिधी) – वाडा (ता. खेड) येथे यात्रेसाठी आलेल्या एका भाविकाच्या कारने अचानक पेट घेतल्याने काही क्षणात ही कार जळून खाक झाली सुदैवाने कोणतेही जीवित हानी झालेली नाही. ही घटना रविवारी (दि. 11) सकाळी घडली. या घटनेमुळे गजबजलेल्या वाडा गावात काही वेळ घबराटीचे वातावरण पसरले होते.
वाडा येथे श्री धर्मनाथ महाराजांच्या यात्रेसाठी कान्हेवाडी येथील सतीश निमसे हे आपली मारूती कार (एमएच 14 जेएम 6845) घेवून वाडा येथे उत्सवासाठी आले होते. त्यांनी कार रस्त्याच्या कडेला उभी करून ते बैलगाडा शर्यतींचा आनंद घेत असताना त्यांच्या कार ने अचानक पेट घेतला. आगीच्या ज्वाळा मोठ्या असल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी गाडीजवळ जाण्यास कोणीही धजावत नव्हते. वाडा गावात कोणतीही अग्निशामक यंत्रणा नसल्याने काही वेळातच कार पूर्णपणे जळून खाक झाली.
कार पेटल्याची वार्ता बैलगाडा घाटातील नागरिकांना समजताच बैलगाडा शौकीन वाडा गावातील बर्निंग कार पाहण्यासाठी बैलगाडा शौकिनांची गर्दी झाली. इतकी गर्दी झाली की बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना ती हटवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. दरम्यान या बर्निंग कारची पोलिस कसून चौकशी करणार असून तूर्तास आगीचे कारण समजू शकले नाही.