पुणे – पारंपरिक वेशभूषेतील कार्यकर्ते, गणरायाच्या आगमनाच्या निमित्ताने ओसंडून वाहणारा उत्साह, फुलांच्या आकर्षक रथात आणि वाजतगायत निघालेली बाप्पाच्या आगमनाची मिरवणूक असे आनंदी, उत्साही आणि चैतन्यपूर्ण वातावरण गुरुजी तालीम मंडळाच्या मिरवणुकीत पाहायला मिळाले.
सकाळी बाप्पांच्या मिरवणुकीला सुरुवात होताच गणपती बाप्पाचा जयघोष अन् तालांचा गजर सुरू झाला. सुभाष आणि स्वप्नील सरपाले यांनी साकारलेल्या फुलांच्या आकर्षक रथामध्ये गणरायाची मूर्ती विराजमान झाली होती. मिरवणुकीमध्ये जयंत नगरकर यांचे नगारावादन लक्षवेधी ठरले. तर गंधर्व ब्रास बॅंड, गुरुजी प्रतिष्ठान ढोल – ताशा पथक, अभेद्य ढोल- ताशा पथक, शिवप्रताप ढोल – ताशा पथकांच्या वादनाने भक्तांची मने जिंकली. ही मिरवणूक गुरुजी तालीम मंदिर- गणपती चौक – लिंबराज महाराज चौक – अप्पा बळवंत चौक – जोगेश्वरी चौकातून उत्सव मंडपात आली.
दुपारी तीन वाजता युवा उद्योजक आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सव प्रमुख पुनीत बालन आणि जान्हवी धारिवाल- बालन यांच्या हस्ते श्रीगणेशाच्या मूर्तीची विधिवत पद्धतीने प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी, पदाधिकारी उपस्थित होते.