सोलापूरात ‘मविआ’चे जागावाटप ठरले; काँग्रेस मोठा भाऊ, तर शरद पवार गटाला इतक्या जागा, जाणून घ्या

सोलापूर : सोलापुरात महापालिकेसाठी महाविकास आघाडीच्या काँग्रेस, ठाकरसेना, राष्ट्रवादी(शप), माकप ह्या सर्व पक्षांच्या नेत्यांनी एकत्रित येऊन जागावाटपाची घोषणा केली आहे. भाजपला रोखण्यासाठी महा विकास आघाडीतील राजकीय पक्ष मनसेसह याठाकाणी एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे.
त्यामळे, सोलापुरात भाजप-शिवसेना युती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार असल्याचे पहायला मिळत आहे. तसेच, आम्ही आप आणि वंचितलाही सोबत येण्याचे आवाहन केले आहे. पण, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचे, माजी आमदार नरसय्या आडम यांनी म्हटले आहे.
सोलापुरातील महापालिकेच्या 102 जागांसाठी हे जागावाटप निश्चित झाले आहे. दरम्यान, सोलापुरात महाविकास आघाडीची घोषणा झाली असली तरी, पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. शिवसेना शहर प्रमुख अजय दासरी म्हणाले, भाजप विरोधात सर्वजण एकत्र आलो आहोत. सर्वच पक्षांनी यामध्ये त्याग केला आहे. केवळ भाजपला हरवण्यासाठी आम्ही आघाडी केली आहे.
आम्ही सर्व 102 जागा एकत्रित लढत असून मनसे देखील आमच्या सोबत आहे. काँग्रेस 45, ठाकरेसेना 30, राष्ट्रवादीश्र(शप) 20 आणि माकप7 असा हा फॉर्म्युला निश्चित झाल्याचे शिवसेना शहर प्रमुख अजय दासरी यांनी सांगितले. खासदार प्रणिती शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, नरसय्या आडम मास्तर , खासदार ओमराजे निंबाळकर, माजी खासदार चंद्रकांत खैरे हे नेते येत्या 4 तारखेला प्रचाराच्या शुभारंभाचा नारळ फोडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, काँग्रेसच्या वाट्याला ठाकरेसेनेपेक्षा जास्त जागा आल्याने शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. ठाकरे गटाचे उत्तर विधानसभा शहर प्रमुख महेश धाराशिवकर यांनी शहरप्रमुख अजय दासरी यांना याबाबत जाब विचारला आहे. आघाडीच्या पत्रकार परिषदेवेळी शिवसैनिकांनी दासरी यांच्याकडे कमी जांगाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी, महेश धाराशिवकर आणि अजय दासरी यांच्यात शाब्दिक बचाबाची झाली असून एकमेकांना बघून घेण्याची भाषा देखील दोन्ही नेत्यांनी केल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते.





