निकालाआधीच भाजपकडून विजयोत्सुव! सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ नगरपरिषदेसाठी झळकले विजयाचे बॅनर

सोलापूर : आज २१ डिसेंबर राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायती अशा एकूण २८८ नगरपरिषद आणि नगरपंचायतीचा निकाल जाहीर होत आहेत. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्याने या निवडणुकीला विशेष महत्व आहे. सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला सुरूवात झाली असून, कल हाती यायला लागले आहेत. अशातच निवडणुकीची चित्र किंबहुना निकाल स्पष्ट होण्याअगोदरच सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट नगरपरिषेदासाठी भाजप कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केला जात आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट नगरपरिषदेसाठी निकालाआधीच भाजपा कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष सुरु केला आहे. अक्कलकोटमध्ये नगराध्यक्ष पदासाठी मैदानात असलेल्या उमेदवाराचे अभिनंदनाचे बॅनर झळकले आहेत. तसेच भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष केला आहे. खरंतर या निवडणुकीकडे महापालिकेची रंगीत तालीम म्हणून पाहिले जाते. येथे भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मिलन कल्याणशेट्टी यांच्या नगराध्यक्ष असा उल्लेख करत अभिनंदनाचे बॅनर अक्कलकोट शहरात झळकले आहेत. यामुळे उत्साही कार्यकर्त्यांनी निकालाआधीच विजयाचा जल्लोष साजरा केला आहे.
अक्कलकोट नगरपरिषद निवडणूक मोठी झाली. या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट विरुद्ध काँग्रेस अशी तिरंगी लढत येथे झाली. भाजपतर्फे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे बंधू मिलन कल्याणशेट्टी, काँग्रेसतर्फे अशपाक बळोरगी, शिवसेना शिंदे गटातर्फे रईस टिनवाला हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. या तिघांमधून अक्कलकोट नगरपरिषदेचा नगराध्यक्ष होणार आहे. अक्कलकोट नगरपरिषदमध्ये एकूण २५ प्रभाग (सदस्य जागा) आणि थेट नगराध्यक्षपद आहे.
हेही वाचा : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात





