सिंधुदुर्ग/मुंबई – शिवसेना आमदार वैभव नाईक आणि भाजपा नेते नारायण राणे यांच्या सर्मथकांत मोठी धुमशान उडण्याच्या बेतात असताना पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला.
त्यावरून खासदार संजय राऊत यांना नितेश राणे यांनी शिवप्रसादाचे पार्सल सामना ऑफिसात पाठवून देऊ का? असे ट्विट करत डिवचले आहे.
कुडाळ मालवण मतदारसंघात एकमेव पेट्रोल पंप नारायण राणे यांचा आहे. आमदार वैभव नाईक यांनी पेट्रोल विरोधात निदर्शने करण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांना 100 रुपयांत दोन लिटर पेट्रोल आणि सामान्य नागरिकांना एक लिटर पेट्रोल मोफत असे आंदोलन जाहीर केले. मात्र मतदारसंघात राणे यांचाच पेट्रोलपंप असल्याने आमदार नाईक तेथे पोहोचले. त्यांनी आंदोलन सुरू केल्याचे समजताच राणे समर्थक तेथे पोहोचले.
दोन्ही गटात वादावादी सुरू झाली. त्यात वैभव नाईकही सहभागी झाले. राणे यांच्या पेट्रोल पंपावर आला कशासाठी, असे म्हणत राणे समर्थक आक्रमक झाले. त्यात धुमशान उडण्याची वेळ आली. मात्र, पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही गटांना माघारी पिटाळले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
संजय राऊत यांना टोला
आमदार नितेश राणे या प्रकरणावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना टोला लगावला. शिवप्रसाद काय असतो, हे संजय राऊतांनी वैभव नाईकांना विचारावं, पोटभर दिलाय आज आमच्या कार्यकर्त्यांनी. पाहिजे असेल, तर पार्सल घेऊन येतो सामना ऑफिसमध्ये. टेस्ट आवडेल नक्की! असे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे.
शिवसेना भवनवर झालेल्या भाजपा – सेना राड्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले होते, शिवसेना भवनावर हल्ला करण्याची हिंमत कोणामध्येच नाही. शिवसेना भवन हे महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतीक आहे.
राजकीय मतभेद असू शकतात. पण ती बाळासाहेब ठाकरेंची वास्तू आहे. त्याच्यावर चाल केली तर शिवसैनिक आणि मराठी माणूस शांत बसेल का? शिवप्रसाद दिला आहे, शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नका, असा अप्रत्यक्ष इशाराही राऊतांनी दिला होता. त्याचा संदर्भ घेऊन आज सिंधुदुर्गात झालेल्या राड्यासंदर्भात नितेश राणेंनी हा खोचक टोला लगावला आहे.