आळंदीत भाजप-शिवसेना युती? भाजपच्या सत्तेत उपनगराध्यक्षपदी शिवसेनेला मिळाली संधी

आळंदी – आळंदी नगरपरिषदेमध्ये भाजपचे पूर्ण बहुमत असून सुद्धा शिवसेनेचे नगरसेवक आदित्य घुंडरे यांची आळंदी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. राज्यात एकमेकांचे विरोधक असलेले भाजप-शिवसेना आळंदी नगर परिषदेमध्ये मात्र कायम एकत्र राहिले आहेत.

मावळत्या उपनगराध्यक्षा पारूबाई तापकीर यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक घेण्यात आली. भाजप पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार शिवसेनेचे नगरसेवक आदित्य घुंडरे यांचा एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. पीठासिन अधिकारी तथा आळंदी नगरपरिषद नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी ही निवड जाहीर केली. शासन निर्देशाने झूम ऍप द्वारे उपनगराध्यक्ष पदाची सभा घेण्यात आली. या सभेला 16 नगरसेवक उपस्थित होते.

मावळत्या उपनगराध्यक्षा पारूबाई तापकीर आणि शिवसेनेच्या नगरसेविका स्नेहल कुऱ्हाडे हे सभेला गैरहजर होते. उपनगराध्यक्ष निवडीनंतर नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष आदित्य घुंडरे यांचा सत्कार केला.

यावेळी मुख्याधिकारी अंकुश जाधव, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील, सचिन पाचुंदे, भाजप गटनेते पांडुरंग घुले, विरोधी पक्षनेते तुषार घुंडरे, नगरसेवक प्रशांत कुऱ्हाडे, सागर बोरुंदिया, सचिन गिलबिले, प्रकाश कुऱ्हाडे, सागर भोसले, सचिन गिलबिले, नगरसेविका प्राजक्ता घुंडरे, मीराताई पाचुंदे, शैला तापकीर, प्रमिला रहाणे, सुनिता रंधवे, रुक्‍मिणी कांबळे, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर, दिनेश घुले, संदिप रासकर, भाजपचे शहराध्यक्ष किरण येळवंडे, शिवसेना शहरप्रमुख अविनाश तापकीर आळंदी शहर युवा मोर्चा अध्यक्ष आकाश जोशी, शहर शिवसेना संपर्कप्रमुख बालाजी शिंदे, भाजप ओबीसी आघाडीचे शहराध्यक्ष ज्ञानेश्वर बनसोडे, नितीन घुंडरे, मयूर घुंडरे, प्रीतम किरवे, प्रमोद कुऱ्हाडे, अरुण घुंडरे, अविरत फाउंडेशनचे अध्यक्ष निसारभाई सय्यद उपस्थित होते.

पाच वर्षांत सात उपनगराध्यक्ष
आळंदी नगरपालिकेत पाच वर्षाच्या कारकिर्दीत आतापर्यंत एकूण सात नगरसेवकांनी उपाध्यक्षपदाची माळ गळ्यात घातली. सुरुवातीला प्रशांत कुऱ्हाडे, सागर भोसले, सचिन गिलबिले, मीराताई पाचुंदे, सागर बोरुंदिया, पारूबाई तापकीर व सरतेशेवटी शिवसेनेचे आदित्या घुंडेरे यांच्या गळ्यात उपाध्यक्षपदाची माळ पडली. आता अवघे काही महिनेच निवडणुकीला उरले आहेत. त्यात अल्पावधीसाठी आदित्य राजे घुंडरे यांना संधी प्राप्त झाली आहे. कदाचित आणखीही एखादा उपनगराध्यक्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

“माझ्यावर विश्वास दाखवत जी जबाबदारी सोपवली ती निश्चितच नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन पूर्ण करण्यासाठी मी येत्या काळात प्रयत्न करणार आहे. तसेच आळंदी शहराच्या विकासाच्या दृष्टीने माझे जास्तीत जास्त योगदान देण्याचा मी प्रयत्न करेन.”
-आदित्य घुंडरे, नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.