पुणे – पुण्यात सार्वजनिक उत्सव साजरे होताना काही कार्यकर्ते समोर दिसतात आणि काही पडद्यामागून काम करत असतात. जे कार्यकर्ते दिसत नाहीत त्यांचे काम मोठे आहे. उत्सव यशस्वी होतो तेव्हा सफाई कर्मचारी आणि विद्युत कर्मचारी यांची भूमिका महत्त्वाची असते, असे मत अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील यांनी व्यक्त केले.
मानाचा चौथा महागणपती श्री तुळशीबाग गणपती मंडळ आणि हुतात्मा बाबूगेनु मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे महापालिकेच्या सफाई कर्मचारी आणि विद्युत कर्मचारी यांचा दिवाळीनिमित्त कृतज्ञता सन्मान आयोजित करण्यात आला होता. यावेळी पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ ट्रस्टचे सरचिटणीस हेमंत रासने, श्री तुळशीबाग गणपती मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, हुतात्मा बाबूगेनु मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ पवार, नितीन पंडित विनायक कदम, दुर्गेश नवले, नितीन खेडेकर, मिलिंद होनराव, गणेश घम, प्रदीप इंगळे, चकोर सुबंध, साई डोंगरे उपस्थित होते.
सफाई कर्मचारी आणि विद्युत विभागातील कर्मचारी हे केवळ कर्तव्य म्हणून आपले काम करत नाहीत, तर हे आपले काम आहे, असे समजून मनापासून त्यांचे काम करतात. त्यांचा सन्मान आणि कौतुक केल्यामुळे कामाला उत्साह येतो, असे डॉ. खेमनार म्हणाले.
संदीप सिंह गिल म्हणाले, सार्वजनिक रस्त्यावर आपली जबाबदारी विसरून जो कचरा आपण टाकतो, तो कचरा सफाई कर्मचाऱ्याद्वारे उचलला जातो. त्यामुळे रस्ते स्वच्छ दिसतात आणि आपल्या सर्वांचे आरोग्य देखील चांगले राहते. आपण विचार करतो की चांगला आहार आणि व्यायामामुळे आपले आरोग्य चांगले राहते, परंतु आपले आरोग्य चांगले राहण्यास सफाई कर्मचाऱ्यांचे खूप मोठे योगदान आहे.
पंडित यांनी प्रास्ताविक केले, नवले यांनी आभार मानले, होनराव यांनी सूत्रसंचालन केले.