पुणे – तीन वर्षांपासून रखडलेल्या पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदाच्या परीक्षेचा निकाल अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज जाहीर केला. जवळपास 650 जागांसाठी घेण्यात आलेल्या या पदाची तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यात सुनील कचकड यांनी राज्यात पहिला क्रमांक पटकावला असून, निर्मलकुमार भोसले यांनी दुसरा, तर गणेश जाधव यांनी तिसरा क्रमांक मिळवला.
दरम्यान, तात्पुरत्या निकालावरून उमेदवारांना आपली निवड होणार असल्याचे लक्षात येताच, शहरात स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांसह उत्तीर्णांनी एकच जल्लोष केला.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020 अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदाची (पीएसआय) तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात आली. मात्र 65 पदांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. तीन वर्षांपासून हा निकाल रखडला होता. हा निकाल जाहीर करण्याची मागणी उमेदवारांकडून होत होती. अखेर हा निकाल जाहीर करण्यात आला. उमेदवारांकडून भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (ऑप्टिंग आऊट) पर्याय मागवण्यात आला आहे. त्यासाठी लिंक 5 जुलै रोजी खुली होणार असून, अंतिम मुदत 11 जुलैपर्यंत आहे.
जाहीर करण्यात आलेली निवड यादी तात्पुरत्या स्वरुपाची असून, उमेदवारांच्या अर्जांमधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी कागदपत्रे, प्रमाणपत्रांची पडताळणीअंती काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये, शिफारसीमध्ये फरक पडू शकतो. त्यामुळे उमेदवारांचा गुणवत्ताक्रम बदलू शकतो, उमेदवार अपात्र ठरू शकतो, असे स्पष्ट करण्यात आले. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) या आरक्षणाच्या अनुषंगाने उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणातील न्यायालयाचे आदेश विचारात घेऊन आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या प्रवर्गासाठी राखीव पदांचा निकाल स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले.