वॉशिंग्टन – अफगाणिस्तानमधील राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभुमीवर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने त्या देशाचा निधी रोखला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने अलिकडेच सदस्य देशांसाठी 650 अब्ज डॉलरच्या आर्थिक मदतीची घोषणा केली होती.
“स्पेशल ड्रॉईंग राईटस’ अंतर्गत या निधीची सदस्य देशांसाठी तरतूद करण्यात आली होती. मात्र अफगाणिस्ताला सध्या तरी हा निधी मिळू शकणार नाही, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रवक्ते गॅरी राईस यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. अफगाणिस्तानमधील सरकारबद्दल अजून अनिश्चिता असल्याने हा निधी रोखला असल्याचे त्यांनी सांगितले.
अफगाणिस्तानमधील तीव्र आर्थिक आणि मानवतावादी समस्यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला चिंता आहे, असेही राईस यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बॅंकेनेही अफगाणिस्तानसाठी पूर्वीच मंजूर केलेले कर्ज थांबवले आहे. याशिवाय “फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स’नेही आपल्या 39 सदस्य राष्ट्रांना तालिबानी मालमत्तांचा वापर करू न देण्याची सूचना केली आहे.