पुणे – तब्बल पाच वर्षांपासून थकलेली 3 लाख रुपयांची पोटगी पतीने एकाच दिवसात भरली. कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार दरमहा 12 हजार रुपये पोटगीचा आदेश फेब्रुवारी 2018 मध्ये झाला होता. तर घटस्फोटाच्या दाव्यात दरमहा 3 हजार रुपये पोटगीचा आदेश मार्च 2019 मध्ये झाला होता. दोन्ही मिळून पोटगी थकली होती. त्यातील 3 लाख रुपये एकाच दिवशी दिले. तर कौटुंबिक हिंसाचाराची आणखी काही पोटगी भरणे बाकी आहे.
सागर आणि सागरिका (नावे बदलली आहेत) अशी दोघांची नावे आहेत. पत्नीच्या वतीने ऍड. राणी कांबळे-सोनावणे, पतीच्या वतीने ऍड. स्वरांजली वाघ यांनी काम पाहिले. तो 63 वर्षाचा असून, ती 53 वर्षाची आहे. तो शासकीय कंपनीतून निवृत्त झाला आहे. त्याला पेन्शन सुरू आहे. तर ती गृहिणी आहे. दोघांचाही दुसरा विवाह आहे. मार्च 2008 मध्ये विवाह झाला होता. काही वर्षे दोघांनी संसार केला. मात्र, 2016 मध्ये त्याने तिला नांदवायचे बंद केले. तेव्हापासून ती माहेरी राहत आहे. त्याने 2016 मध्येच घटस्फोटासाठी अर्ज केला आहे.
तर तिने कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार दावा दाखल केला आहे. या दोन्ही दाव्यात तिला पोटगी देण्याचा आदेश दिला आहे. मात्र, सागर पोटगी भरत नव्हता. त्यामुळे सागरिकाने त्याच्याविरोधात वसुलीची केस दाखल केली. त्यावेळी 3 लाख रुपये पोटगी थकलेली होती. ती पतीने एकाच दिवसात भरली. कौटुंबिक हिंसाचार प्रकरणाची आणखी काही पोटगी भरायची आहे.
कौटुंबिक स्वरूपाच्या अनेक दाव्यांमध्ये न्यायालयाकडून पोटगीचे आदेश दिले जातात. मात्र, पती पोटगी भरत नाहीत, असे दिसून येते. परिणामी, पत्नीला दैनंदिन गरजा भागविणेही अवघड बनते. या प्रकरणात मात्र पतीने एका तारखेलाच मोठ्या रक्कमेची पोटगी भरली.
ऍड. राणी कांबळे-सोनावणे, पत्नीच्या वकील