फ्रिटाऊन (सीएरा लीओन) – आफ्रिकेतील सीएरा लीओन या छोट्याशा देशात तेलाच्या टॅंकरच्या स्फोटात किमान 98 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर सुमारे 100 जण भाजल्यामुळे जखमी झाले आहेत. ही दुर्घटना शुक्रवारी घडली.
तेलाची वाहतूक करणाऱ्या टॅंकरची एका ट्रकला धडक बसल्यानंतर टॅंकरमधून तेलाची गळती सुरू झाली होती. त्यानंतर हे तेल गोळा करायला मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. त्याचवेळी या टॅंकरचा स्फोट झाल्यामुळे आजूबाजूचे लोक त्यामध्ये होरपळले. राजधानी फ्रिटाऊनपासून जवळच्या वेलिंग्टनमध्ये ही दुर्घटना घडली, असे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेने सांगितले.
अपघातानंतर दोन्ही वाहनांमधील चालकांनी नागरिकांना तेलगळती होत असलेल्या टॅंकरपासून दूर राहण्याचे आवाहन केले होते. टॅंकरमधील तेलगळती थांबवण्याचाही प्रयत्न या चालकांनी केला होता.
सीएरा लीओनमधीले तेलाची कमतरता अजिबात नाही. मात्र तरिही नागरिकांनी सतर्कतेच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून मोठी गर्दी केली होती. तेलाच्या टॅंकरचा स्फोट नक्की कशामुळे झाला हे समजू शकले नाही. मात्र गळती सुरू झाल्यानंतर थोड्आच वेळात हा स्फोट झाला.