पुणे – “राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी'(एनडीए) 2024 मध्ये स्थापनेची 75 वर्षे पूर्ण करत आहे. त्यानिमित्ताने रविवारी “एनडीए मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये संपूर्ण देशभरातून 13 हजार 500 जणांनी सहभाग नोंदवला. 16 जानेवारी 2023 पासूनच “एनडीए’मध्ये विविध शैक्षणिक, क्रीडा आणि साहसी उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. 75 वर्षांचा गौरवशाली इतिहासाला यानिमित्ताने उजाळा दिला जात आहे.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. प्रबोधिनीच्या आवारात होणारा अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम ठरला. या मॅरेथॉनमध्ये 42 किमी पूर्ण मॅरेथॉन, 21 किमी हाफ-मॅरेथॉन, 10 किमी धावणे, 5 किमी धावणे आणि तीन किमी धावणे अशा शर्यती झाल्या. यामध्ये वयवर्षे पाच ते 96 या विविध वयोगटांतील स्पर्धकांनी सहभाग घेतला.