Priyanka Gandhi : “आयोगाला एक दिवस उत्तर द्यावेच लागेल”; प्रियंका गांधींचा सवाल
Priyanka Gandhi – जर निवडणूक आयोगाला वाटत असेल की त्यांची जबाबदारी फक्त भाजपशी निगडीत आहे, तर त्यांनी पुन्हा विचार करायला हवा. ही आपल्या देशाची लोकशाही आहे. हा विनोद नाही. ही कोणत्याही पक्षाची अंतर्गत बाब नाही. जर त्यांनी मतचोरीची चौकशी केली नसेल तर कठिण आहे. निवडणूक आयोगाची जबाबदारी खूप मोठी आहे.
माझ्या भावाने म्हटल्याप्रमाणे, एक दिवस असा येईल जेव्हा इतर लोक सत्तेत असतील आणि नंतर ज्यांनी आपली लोकशाही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात हातमिळवणी केली, त्यांना त्याचे उत्तर द्यावेच लागेल, असे प्रतिपादन काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वड्रा यांनी शुक्रवारी केले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी बोलताना निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. आयोगाने मते चोरल्याचे वास्तव त्यांनी मांडले. राहुल गांधींच्या आरोपांवर, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी राहुल गांधींना त्यांच्या निवडणूक धांदलीच्या दाव्यांचे तपशील विचारले होते.
कमीत कमी तीन राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांना मतदार यादीतून चुकीच्या पद्धतीने समाविष्ट किंवा वगळण्यात आले असल्याचा दावा करणाऱ्या मतदारांची नावे शेअर करण्यास सांगितले आहे. तेव्हा प्रियंका गांधी यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे.
निवडणूक आयोगाचे अधिकारी म्हणतात की, राहुल गांधींनी देशवासीयांची दिशाभूल करणे थांबवावे आणि निवडणूक अधिकाऱ्यांवर निराधार आरोप करणे थांबवावे. यावर प्रियंका गांधी म्हणाल्या, निवडणूक आयोग जे प्रतिज्ञापत्र मागत आहेत ते कायद्यानुसार आहे.
ज्या अंतर्गत तुम्हाला ३० दिवसांच्या आत याचिका दाखल करावी लागेल, अन्यथा काहीही होणार नाही. मग ते प्रतिज्ञापत्र का मागत आहेत? एवढा मोठा खुलासा झाला आहे. जर हे अनवधानाने घडले असेल तर त्याची चौकशी करा.





