Syria blast : सीरियामधील स्फोटांमध्ये १८ जखमी; फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉ यांच्या भेटीदरम्यान झाले स्फोट
सीरियामची राजधानी दमास्कसमध्ये आज दोन अतिशय मोठे स्फोट झाले. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ सीरियाचे अध्यक्ष अहमद अल शारा यांच्या भेटीसाठी सीरियामध्ये आले असतानाच हे स्फोट झाले.

Syria blast – सीरियामची राजधानी दमास्कसमध्ये आज दोन अतिशय मोठे स्फोट झाले. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ सीरियाचे अध्यक्ष अहमद अल शारा यांच्या भेटीसाठी सीरियामध्ये आले असतानाच हे स्फोट झाले. या स्फोटांमध्ये किमान १८ जण जखमी झाले आहेत, असे सीरियाच्या गृहमंत्रालयाने म्हटले आहे.
इमॅन्युएल मॅक्रॉ हे सीरियाचे अध्यक्ष अहमद अल शारा यांच्या भेटीसाठी अध्यक्षीय राजवाड्यामध्ये दाखल झाले असतानाच मॅक्रॉ ज्या हॉटेलमध्ये उतरले त्या फोर सीजन्स हॉटेलजवळ हे स्फोट झाले. या स्फोटांमुळे मॅक्रॉ यांना कोणतीही दुखापत झाली नाही.
मॅक्रॉ आणि शारा यांच्यातील बैठक निर्विघ्नपणे सुरू राहिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हे दोन्ही स्फोट स्फोटकांच्या उपकरणांनी घडवले गेले होते. यातील एक बॉम्ब कचऱ्याच्या पेटीमध्ये ठेवला गेला होता. तर दुसरा बॉम्ब पार्क केलेल्या कारमध्ये ठेवला होता.
जखमींपैकी चौघे पोलीस कर्मचारी आहेत. पण या स्फोटांमध्ये कोणाचाही मृत्यू झाला नाही, असे गृह मंत्रालयाने म्हटले आहे.
शारा यांनी सीरियाची सत्ता ताब्यात घेतल्यापासून त्यांची भेट घेण्यासाठी सीरियामध्ये आलेले मॅक्रॉ हे पहिलेच मोठे पाश्चात्य नेते आहेत.
तुर्कीयेची राजधानी अंकारामध्ये होत असलेल्या नाटोच्या परिषदेला जाण्यापुर्वी मॅक्रॉ यांनी सीरियाचा दौरा केला आहे. मात्र मॅक्रॉ आणि शारा यांच्या भेटीमध्ये विघ्न आणण्याच्या उद्देशाने हे स्फोट घडवून आणण्यात आले.
शारा यांनी २०२४ मध्ये बशर अल असाद यांची राजवट उलथवून शांतता आणि स्थैर्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. इस्लामी राजवटीबाबत साशंक असलेल्या अल्पसंख्य गटांना आवाहन केले आणि पाश्चात्य देशांचा विश्वास मिळवण्याचाही प्रयत्न केला.
अनेक दशकांपासून एकाधिकारशाही असलेल्या सीरियामध्ये आर्थिक आणिराजकीय सुधारणा करण्याची ग्वाही शारा यांनी दिली आहे. सीरियावरील बहुतेक निर्बंध युरोप आणि अमेरिकेने हटवण्यासाठी मॅक्रॉ यांनी विशेष पुढाकार घेतला होता. त्यांच्या भेटीदरमयान काही सामंजस्य करार होणेही अपेक्षित आहे.
यादवीनंतरच्या सीरियापुढे अनेक आव्हाने…
सीरियामध्ये अशा प्रकारचे स्फोट अलिकडच्या काळात झाले आहेत. काही दिवसांपुर्वी दमास्कसमधील जस्टिस पॅलेसजवळच्या कॅफेमध्ये झालेल्या स्फोटात किमान १० जण ठार आणि २० जण जखमी झाले होते.
सीरियात नेक लहान मोठ्या गटांमधील संघर्षात तब्बल ५ लाखांपेक्षा जास्त लोक ठार झाले आहेत आणि लक्षावधी लोकांना विस्थापित व्हावे लागले आहे.
तरी देशातीलउद्योगांमध्ये मोठ्या गुंतवणूकीची हमी मिळाली आहे. देशाला यादवी युद्धानंतरची फेरउभारणी करण्यासाठी आणि लक्षावधी लोकांना दारिद्र्यातून बाहेर काढण्यासाठी अब्जावधी डॉलरची गरज आहे.





