Tejashwi Yadav : तेजस्वी यादव संशयाच्या धुक्यात; निवडणूक आयोगाने मागवले मतदार ओळखपत्र

पाटणा : निवडणूक आयोगाविरोधात दंड थोपटणारे राजदचे नेते तेजस्वी यादव यांच्या भोवतीच संशयाचे धुके निर्माण झाले आहे. बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते असणाऱ्या तेजस्वींकडे २ मतदार ओळखपत्र असल्याचे चित्र पुढे आले आहे. संबंधित बाबीची गंभीर दखल तातडीने निवडणूक आयोगाने घेतली. तसेच, तेजस्वी यांना संशयाला निमंत्रण देणारे ओळखपत्र ( मतदार आयडी कार्ड) सादर करण्यास सांगितले.
बिहारमध्ये नुकताच मतदार याद्या पडताळणीचा पहिला टप्पा समाप्त झाला. त्यानंतर प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. त्यावरून राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे पुत्र असणाऱ्या तेजस्वी यांनी निवडणूक आयोगाला घेरले. त्यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत आपलेच नाव मतदार म्हणून गायब असल्याचा दावा केला. त्यांनी मतदार ओळखपत्र क्रमांकाच्या (इपिक नंबर) सहाय्याने ऑनलाईन सर्चही करून दाखवले. मात्र, त्या नंबरच्या आधारे नाव आढळत नसल्याचे प्रात्यक्षिक त्यांनी दाखवले. त्यानंतर निवडणूक आयोगाने प्रारूप यादीत त्यांचे नाव असल्याचे निदर्शनास आणून दिले.
तेजस्वी यांच्या नाव गायब असल्याच्या दाव्याची निवडणूक आयोगाने आणखी छाननी केली. तेजस्वी यांनी पत्रकार परिषदेत नमूद केलेला इपिक नंबर अधिकृतरित्या आपण जारी केला नसल्याचे आयोगाला आढळले. दुसऱ्या नंबरच्या आधारे तेजस्वी यांचे नाव प्रारूप यादीत आढळते. त्यामुळे तेजस्वी यांनी जो नंबर नमूद केला त्याच्या जोरावर दुसरे मतदार ओळखपत्र त्यांच्याकडे असावे, असे आयोगाला वाटत आहे. त्यावरून त्यांचे बनावट मानले जाणारे ओळखपत्र अधिक तपासासाठी आयोगाने मागवले आहे. संबंधित ओळखपत्र बनावट असल्याचे सिद्ध झाल्यास तेजस्वी कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे.





