कोपरगाव – शहरातील अंबिकानगर परिसरात श्री साईधाम मंदिराचा चोवीसावा वर्धापनदिन शुक्रवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नितीन कोल्हे, संजीवनी उद्योग समूह अध्यक्ष बिपिन कोल्हे यांनी उपस्थितांचे स्वागत केले, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे प्रमुख प.पू. रमेशगिरी महाराज व जंगलीदास माऊली यांच्याहस्ते माध्यान्ह आरती करून प्रसादाचा महानैवेद्य दाखविण्यात आला.
प. पू. धोंडीबाबा चव्हाण व साईबाबा मंदिरावर विद्युत रोषणाईसह फुलांची भव्य प्रमाणात सजावट करण्यात आली. पहाटपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमाने या सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. हरिद्वार, काशी, द्वारका येथील साईभक्तांनी आणलेल्या पवित्र जलाबरोबरच प्रतीशिर्डी पुणे येथील उस्मानभाई यांच्या मातोश्री व मुलीने पवित्र हज यात्रा करून तेथून आणलेल्या जमजम नदीचे पवित्र जलच्या सहाय्याने साईबाबांच्या मूर्तीस ब्रम्हवृंदांच्या साक्षीने महामस्तकाभिषेक घालण्यात आला.
विविध राज्यातील साईभक्तांनी भजनासह बहारदार कला सादर केली. प्रख्यात ड्रमवादक शिवामणी यांनी विदेशातून भ्रमणध्वनीच्या सहाय्याने साईधाम सोहळ्याचे सर्व क्षण डोळ्यात साठवले. संगणकतज्ज्ञ विजय नायडू, रोहित वाघ, नाना नवले, राजेंद्र शिंगी, साहेबराव मढवई, एकनाथ चव्हाण व चव्हाण कुटुंबीयांसह सर्व साई भक्तांनी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य दिले.
याप्रसंगी डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेच्या वतीने सुभाष आगळे, साईबाबा संस्थान शिर्डीचे माजी विश्वस्त, प्रति शिर्डी शिरगाव (पुणे) येथील अध्यक्ष माजी आमदार प्रकाश देवळे, अमेरिकेच्या साईभक्त अनिता नाईक व त्यांचा सर्व परिवार, महानंदाचे अध्यक्ष राजेश परजणे, उद्योजक डॉ. मुथा (पुणे), वसंतराव पिंपळे, सपना घुले, थोरात उद्योग समूहाचे आबा थोरात, माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे, उमाताई वहाडणे, साईभक्त, अबाल वृद्ध, महिला भगिनी आदींनी साईबाबांचे मनोभावे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.