पुणे,{प्रभात वृत्तसेवा}- अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, आरोपीने येरवडा पोलीस ठाण्याच्या प्रवेश द्वाराजवळून पळ काढला. येरवडा पोलिसांच्या दहा तासांच्या अथक परिश्रमानंतर आरोपीला विश्रांतवाडी भागातून ताब्यात घेतले.
सिद्धार्थ संजय भालेराव (२१ रा. मु.पो. इनामगाव ता. शिरुर) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार गोविंद जायभाये यांनी फिर्याद दिली आहे. सिद्धार्थ याच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्ह्यात त्याला दोषी ठरविण्यात आले होते.
त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. तो फिर्यादी पोलीस हवालदार जायभाये यांच्या ताब्यात होता. त्यावेळी पित्ताचा त्रास होत असल्याचे बहाणा करून आरोपी भालेराव पोलिसांच्या तावडीतून पळून गेला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून पकडण्याच प्रयत्न केला.
दरम्यान, याची माहिती पहाटेच वरिष्ठांना देण्यात आली आणि तपासचक्रे फिरली. पोलिसांनी भल्या सकाळी संपूर्ण परिसर पिंजून काढला. अखेर दुपारच्या सुमारास विश्रांतवाडी भागात आरोपी सापडला. पोलिसांनी गुरुवारी आरोपीला कोर्टात हजर केले होते, त्यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
मागील काही दिवसांत सायबर पोलीस ठाण्याच्या ताब्यातून दोन आरोपी पळाले होते. यातील एक आरोपी आठवडाभरानंतर सापडला. तर एक महिला आरोपी ट्रान्सिट रिमांडमध्ये असताना रेल्वेतून पळाली आहे. तिचा शोध सुरूच आहे.