सांगली -अहमदाबाद (गुजरात) येथून साळशिंगे (ता. खानापूर जि. सांगली) येथे आलेल्या 30 वर्षीय महिलेचा चाचणी अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे. या महिलेच्या पतीचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. दरम्यान, वाळवा तालुक्यातील 94 वर्षी आजीने करोनावर मात केली आहे.
गुजरातहून सहा दिवसांपूर्वी हे दाम्पत्य साळशिंगे येथे आले होते. त्यांना विटा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. लक्षणे दिसताच मिरज येथील शासकीय रुग्णालयात आयसोलेशन कक्षात शनिवारी दाखल केले होते. रविवारी चाचणी अहवाल आला. पतीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. पत्नीचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे.
दरम्यान, कामेरी (ता. वाळवा) येथील 94 वर्षीय वृद्ध महिलेने करोनावर मात केली आहे. त्यांचा 14 दिवसानंतरचा पहिला चाचणी अहवाल रविवारी करोना निगेटीव्ह आला आहे. सोमवारी त्यांचे दुसऱ्या चाचणीसाठी स्त्रावाचे नमुने घेण्यात आले होते. ते सोमवारी सायंकाळी निगेटिव्ह आले. दरम्यान, मुंबईतून सांगलीतील रेव्हिन्यू कॉलनी आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या मिरजेतील शासकीय रुग्णालयात करोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना दाखल केले आहे. काही जण संस्था क्वारंटाईन आहेत. यांचे स्त्राव तपासणीसाठी घेतले जात आहेत. यातील 30 जणांचे रिर्पोट आज निगेटिव्ह आले. साळशिंगेमधील महिलेसह मिरज रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात 9 जणांवर उपचार करण्यात येत आहेत.