पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सोळाशे महिला सफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या महापालिका प्रशासनाचा या कामगारांनी निषेध केला. कष्टकरी कामगार पंचायत मार्गदर्शनाखाली महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर मंगळवारी (दि. 3) थाळीनाद आंदोलन केले.
गेली वीस वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या महिला सफाई कामगारांना महापालिका सेवेत कायम करावे. दिवाळीनिमित्त एका पगारा एवढा बोनस मिळाला पाहिजे. करोना आपत्ती काळात जिवाची पर्वा न करता आरोग्य सेवा दिल्याबद्दल पाच हजार रुपये आर्थिक मदत मिळावी. थकीत प्राव्हिडंट फंड महिलांच्या नावावर मिळावा आणि सर्व महिलांना प्राव्हिडंट फंड आणि ईएसआय या सुविधा लागू कराव्यात. घरकुल योजनेत या कामगारांना प्राधान्य द्यावे. किमान समान वेतनाचा मागील फरक द्यावा. या कामगारांच्या पाल्ल्यांना मोफत शिक्षण मिळावे.कामाच्या ठिकाणी डबे ठेवण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, करावी.
अजय लोंढे, भारत मिरपगारे, अनिता साळवे यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला. या आंदोलनात बळीराम काकडे, प्रल्हाद कांबळे, मधुरा डांगे, कांताबाई कांबळे, संगीता जानराव, मंगल तायडे, सविता लोंढे, प्रमिला गजभारे, अरुणा पवार, रुक्मिणी कांबळे, जयश्री धोत्रे, आशा पठारे उपस्थित होते.