नवी दिल्ली – बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी मंगळवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. त्या भेटीमुळे राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. तेजस्वी यांनी केजरीवाल यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी ट्विटरवरून भेटीची माहिती दिली.
सामाजिक, राजकीय आणि आर्थिक मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, भेटीमागचा हेतू आणि चर्चेचा तपशील त्यांनी उघड केला नाही. तेजस्वी यांनी ट्विटमधून भाजप आणि केंद्र सरकारवर टीकास्त्रही सोडले. भाजप सरकारने देशाला आणि राष्ट्रीय संपत्तीला भांडवलदारांकडे गहाण ठेवले आहे. आपण सर्वांनी मिळून देशाला वाचवायला हवे, असे त्यांनी म्हटले.
Had the pleasure to receive Sh @yadavtejashwi ji at my residence today. It was a very fruitful meeting. Discussed a wide range of issues affecting the country. https://t.co/twkYhkRvW7
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) February 14, 2023
राष्ट्रीय पातळीवर भाजपविरोधात लढण्यासाठी एकत्र येण्याची गरज विरोधकांच्या गोटातून सातत्याने व्यक्त केली जाते. मात्र, त्या दिशेने ठोस प्रयत्न अद्याप झालेले नाहीत. केजरीवाल यांचा आप आणि इतर काही विरोधी पक्ष अद्याप विरोधकांच्या प्रस्तावित आघाडीविषयी फारसे अनुकूल वाटत नाहीत. त्यापार्श्वभूमीवर, तेजस्वी यांनी घेतलेल्या केजरीवाल यांच्या भेटीचे महत्व वाढले आहे.