Team India Record : टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड! ‘या’ बाबतीत क्रिकेट विश्वात ठरला नंबर १ संघ

Team India sets world record : भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात केवळ विजयच मिळवला नाही, तर एक मोठा जागतिक विक्रम (World Record) आपल्या नावावर केला आहे. वडोदरा येथील बीसीए स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात ३०१ धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत भारताने वनडे क्रिकेटच्या इतिहासात नवी उंची गाठली आहे.
३००+ धावांचा पाठलाग करण्यात भारत जगात अव्वल –
एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जास्त वेळा ३०० किंवा त्यापेक्षा जास्त धावांचे लक्ष्य यशस्वीरित्या गाठणारा भारत हा जगातील पहिला संघ ठरला आहे. भारताने आतापर्यंत तब्बल २० वेळा हा पराक्रम केला आहे. या यादीत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासारखे दिग्गज संघ भारताच्या खूप मागे आहेत.
वनडेमध्ये सर्वाधिक वेळा ३००+ धावांचा पाठलाग करणारे संघ:
- भारत: २० वेळा
- इंग्लंड: १५ वेळा
- ऑस्ट्रेलिया: १४ वेळा
- पाकिस्तान: १२ वेळा
- न्यूझीलंड आणि श्रीलंका: ११ वेळा
पहिल्या वनडेचा थरार: कोहली-गिलची फटकेबाजी –
नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडने हेन्री निकोल्स (६२) आणि डेव्हन कॉनवे (५६) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ५० षटकांत ८ बाद ३०० धावा केल्या होत्या. भारताकडून मोहम्मद सिराज, हर्षित राणा आणि प्रसिध कृष्णा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
३०१ धावांचा पाठलाग करताना ‘किंग’ विराट कोहलीने ९३ धावांची मॅचविनिंग खेळी केली, ज्यासाठी त्याला ‘सामनावीर’ पुरस्कार मिळाला. कर्णधार शुबमन गिलने ५६ धावांचे योगदान दिले, तर श्रेयस अय्यरने ४९ धावा केल्या. अखेरच्या टप्प्यात केएल राहुलने नाबाद २९ धावा करत ४९ व्या षटकात भारताला ४ गडी राखून विजय मिळवून दिला.





