Virat Kohli Reaction : ‘मला चाहत्यांची ‘ही’ गोष्ट अजिबात आवडत नाही’, विराटने धोनीची आठवण काढत व्यक्त केली नाराजी

Virat Kohli Reaction on POTM : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने ४ विकेट्सनी विजय मिळवला आणि वर्षाची सुरुवात विजयाने केली. या सामन्यात ९३ धावांची मॅचविनिंग खेळी करणाऱ्या विराट कोहलीला ‘सामनावीर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारानंतर दिलेल्या मुलाखतीत विराटने आपल्या ट्रॉफीज, कारकिर्दीतील संघर्ष आणि चाहत्यांच्या वागणुकीवर अतिशय प्रामाणिक मते मांडली. विराट नक्की काय म्हणाला? ते जाणून घेऊया.
ट्रॉफीज कुठे ठेवतो? विराटने दिले खास उत्तर –
विराट कोहलीला जेव्हा त्याच्या सामनावीर पुरस्कारांच्या संख्येबद्दल विचारण्यात आले, तेव्हा तो म्हणाला, “खरं सांगू तर माझ्याकडे किती पुरस्कार आहेत याची मला कल्पना नाही. मी माझ्या सर्व ट्रॉफी गुडगावला माझ्या आईकडे पाठवतो. तिला या सर्व ट्रॉफी कपाटात सजवून ठेवायला खूप आवडतं.” विराटच्या या उत्तराने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
सचिनशी तुलना आणि स्वप्नवत प्रवास –
🗣️ If I look back at my whole journey, it’s nothing short of a dream come true. ✨
🎥 Virat Kohli reflects on his incredible career after becoming the 2⃣nd highest run-getter in men’s international cricket🙌👏#TeamIndia | #INDvNZ | @imVkohli | @idfcfirstbank pic.twitter.com/87BgcZlx4b
— BCCI (@BCCI) January 11, 2026
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांच्या बाबतीत आता फक्त सचिन तेंडुलकर विराटच्या पुढे आहे. या यशाबद्दल बोलताना विराट भावूक झाला. तो म्हणाला, “माझा संपूर्ण प्रवास स्वप्नवत आहे. इथपर्यंत पोहोचण्यासाठी मी प्रचंड मेहनत घेतली आहे. देवाने मला माझ्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त दिलं आहे आणि त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. आज मला स्वतःचा अभिमान वाटतो.”
शतक हुकल्याचं दु:ख नाही –
केवळ ७ धावांनी शतक हुकल्याबद्दल विराटने स्पष्ट केले की, तो आता वैयक्तिक विक्रमांसाठी खेळत नाही. “मी सध्या ज्या फॉर्ममध्ये आहे, तिथे मी ‘माईलस्टोन्स’चा विचार करत नाही. पाठलाग करताना संघाला मजबूत स्थितीत नेणं हेच माझं उद्दिष्ट होतं. आम्ही आधी फलंदाजी केली असती, तर कदाचित मी अधिक आक्रमक खेळलो असतो,” असे विराटने नमूद केले.
चाहत्यांच्या उत्साहावर मांडलं रोखठोक मत –
जेव्हा एखादा भारतीय फलंदाज बाद होतो आणि विराट मैदानावर येणार असतो, तेव्हा चाहते जल्लोष करतात. यावर विराटने आपली नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला, “या गोष्टी मला फारशा आवडत नाहीत. एमएस धोनीसोबतही असंच व्हायचं. चाहते उत्सुक असतात हे मला मान्य आहे, पण एखादा खेळाडू बाद होऊन परतत असताना असा जल्लोष होणं त्या खेळाडूसाठी नक्कीच चांगलं नसतं.”
अखेरीस, क्रिकेटच्या माध्यमातून लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणता येतं, यातच आपल्याला खरा आनंद मिळतो, असे सांगत विराटने आपल्या भावनांना पूर्णविराम दिला.





