राहुरी – राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रणित महाविकास आघाडीच्या सत्ताधारी जनसेवा मंडळाने 18 पैकी 16 जागा जिंकल्या. माजीमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे, सभापती अरुण तनपुरे, युवा नेते हर्ष तनपुरे व माजी आमदार प्रसाद तनपुरे यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा मंडळाने हा दणदणीत विजय मिळवला.
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे व माजी आमदार शिवाजी कर्डिले प्रणित तालुका विकास मंडळास केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. सोसायटी मतदारसंघात सत्यजीत चंद्रशेखर कदम व श्यामराव शंकरराव निमसे हे दोघेच विजयी झाले.
विजयी उमेदवारः सोसायटी मतदार संघातून सभापती अरुण तनपुरे सर्वाधिक 814 मते मिळवून विजयी झाले. दत्तात्रय कवाने – 684, बाळासाहेब खुळे – 724, रखमाजी जाधव- 696, महेश पानसरे- 714, महिला गटातून सुनिता रावसाहेब खेवरे – 808, शोभा सुभाष डुकरे – 709.
सहकारी संस्था विशेष मागास प्रवर्ग रामदास बाचकर- 763, शेतकरी प्रतिनिधी सहकारी संस्था इतर मागास प्रवर्गमधून दत्तात्रय शेळके – 697., शेतकरी प्रतिनिधी ग्रामपंचायत सर्वसाधारण प्रतिनिधी मतदारसंघ – शारदा किसन आढाव -458, मंगेश गाडे – 478., शेतकरी प्रतिनिधी: ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमातीः मधुकर पवार- 466, आर्थिक दुर्बल घटक प्रतिनिधी गोरक्षनाथ पवार- 443., व्यापारी आडते मतदारसंघ चंद्रकांत पानसंबळ -308, सुरेशलाल बाफना-312, हमाल मापाडी मतदार संघः मारुती रंगनाथ हारदे-171.,
कृषी उत्पन्न बाजार सोसायटी मतदारसंघातून सत्यजित कदम व शामराव निमसे हे दोन विजयी झाले.
गत संचालक मंडळात चार जागा विरोधकांना मिळाल्या होत्या. यावेळी त्यांना केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. 98 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. दरम्यान, कदम व निमसे यांच्या निवडीला महाविकास आघाडीकडून आक्षेप घेण्यात आला असून त्यासंदर्भात फेर मतमोजणी सुरू करण्यात आली आहे. रात्री उशीरापर्यंत ही फेर मतमोजणी सुरू होती.
राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने पाच वर्षात केलेल्या कामावर मतदारांनी कौल दिला आहे. महाविकास आघाडी चांगल्या मताधिक्याने सत्तेत आली आहे.यापुढील काळातही राहिलेल्या विकास योजना पूर्ण करून पूर्ण केल्या जातील. हा निकाल अपेक्षितच असून मतदारांचे आम्ही आभार मानत आहोत, असे माजी सभापती अरूण तनपुरे म्हणाले.