Swachhata Abhiyan: स्व. अजितदादांच्या जयंतीनिमित्त पुण्यात मोठी मोहीम; विठ्ठलवाडीतून स्वच्छता सप्ताहाचा बिगुल
Swachhata Abhiyan: शहर स्वच्छ ठेवणे हेच स्व. अजितदादांना खरे अभिवादन; स्वच्छता मोहीम केवळ अभियानापुरती न राहण्याचे महापौर मंजुषा नागपुरे यांचे आवाहन.

Swachhata Abhiyan – दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना स्वच्छता आवडायची. शहरे नेहमी स्वच्छ व टापटीप असावीत असा त्यांचा आग्रह असायचा. त्यामुळे त्यांच्या जयंतीनिमित्ताने महापालिकेकडून सुरू करण्यात आलेली स्वच्छता मोहीम ही केवळ तात्पुरत्या अभियानापुरती न राहता एक आदर्श निर्माण व्हावा. असे काम झाले पाहिजे, अशा भावना महापौर मंजुषा नागपुरे यांनी व्यक्त केल्या.
लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त महापालिका प्रशासनातर्फे शहरात १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत स्वच्छता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन नागपुरे यांच्या हस्ते सिंहगड रस्त्यावरील प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठलवाडी येथून करण्यात आले. या वेळी विरोधी पक्षनेते नीलेश निकम, उपमहापौर परशुराम वाडेकर, अतिरिक्त आयुक्त प्रजीत नायर, राष्ट्रवादीचे गटनेते काका चव्हाण,
नगरसेवक सुहास टिंंगरे, घनकचरा व्यवस्थापन विभाग उपायुक्त संतोष वारूळे यांच्यासह महापालिकेचे नगरसेवक उपस्थित होते. महापौर म्हणाल्या, की शहरात नागरिकांकडून अडगळीच्या वस्तू महापालिकेकडे न देता जागा मिळेल तिथे टाकल्या जातात. त्यामुळे महापालिकेने अशा वस्तूंच्या संकलनासाठी विशेष मोहीम राबविणे, तसेच त्यासाठी स्वतंत्र सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. १५ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत ही मोहीम सुरू करण्यात आली असून, उद्घाटनप्रसंगी या भागात झालेल्या स्वच्छता मोहिमेत दोन टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले.





