Bhama Askhed Water : भामा-आसखेडचे पाणी पिवळसर का येतंय? महापालिकेने अखेर केला मोठा खुलासा
Bhama Askhed Water : धानोरी, टिंगरेनगर, विश्रांतवाडी, येरवडा आणि वडगाव शेरी भागात पिवळसर पाण्याचा पुरवठा; पालिकेचा पाणी पिण्यायोग्य असल्याचा दावा.

Bhama Askhed Water : धानोरी, टिंगरेनगर, विश्रांतवाडी, येरवडा, वडगाव शेरी आणि नगर रोड परिसरांत गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पिवळसर पाणी येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाहणी करून हे पाणी पिण्यायोग्य असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, ज्या भागात गढूळ पाणी येत आहे, त्या भागात गुरववारी अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसह पहाणी करणार आहेत.
तसेच ज्या भागात गढूळ पाणी येत आहे त्या ठिकाणच्या जलवाहिन्यांचीही तपासणी केली जाणार आहे. या भागांना भामा आसखेड धरणातून येणारे पाणी कुरुळी येथील पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये प्रक्रिया करून वितरित केले जाते. पालिकेच्या माहितीनुसार, ११ तारखेपासून झालेल्या पावसानंतर धरणातून येणाऱ्या अशुद्ध पाण्याचा रंग वाढलेला आहे.
यापूर्वी अशुद्ध पाण्याचा रंग ५ ते १० हॅझन युनिट इतका होता. तो टप्प्याटप्प्याने वाढून ३० ते ४० हॅझनपर्यंत पोहोचल्याचे निरीक्षण आहे. धरणाची पाणीपातळी कमी होणे, पावसाळी वातावरण आणि शेवाळ वाढणे यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याची शक्यता आहे. परिणामी धरणातून येणाऱ्या पाण्याचा पिवळसरपणा वाढल्याचे दिसते. जलशुद्धीकरण केंद्रामध्ये प्रक्रिया केल्यानंतरही पिवळसरपणा कमी होण्यास वेळ लागतो.
सामान्यतः शुद्ध पाण्याचा रंग ४ ते ५ हॅझन असतो. मात्र, सध्या तो १० ते १५ हॅझनपर्यंत आहे. त्यावर उपाययोजना म्हणून ॲलम (तुरटी) डोझिंगचे प्रमाण वाढविले असून पिवळसरपणा कमी करण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू आहे. सध्या पाण्यातील पिवळसरपणा १० हॅझनपर्यंत कमी झाला आहे.
मात्र, भामा आसखेड (कुरुळी) जलशुद्धीकरण केंद्र ते वितरण व्यवस्थेतील जलटाक्या यामधील मोठे अंतर असल्याने पूर्वी पुरवठा झालेल्या अधिक रंगाच्या पाण्याचे अवशेष तेथे शिल्लक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणी पूर्ववत होण्यासाठी तीन ते चार दिवसांचा कालावधी लागेल, असेही स्पष्ट करण्यात आले.






