Pune : लक्ष्मी रस्ता व कुमठेकर रस्त्यावर विद्युत रोषणाईचे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्याहस्ते उद्घाटन
Pune : पुण्यातील लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता आणि बाजीराव रस्त्यावर दिवाळीनिमित्त विद्युत रोषणाई करण्यात आली. आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते उद्घाटन.

Pune : पुण्याच्या पारंपरिक बाजारपेठांना दिवाळीनिमित्त आकर्षक रूप देण्यासाठी लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता आणि बाजीराव रस्त्यावर करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईचे उद्घाटन पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. पुणे व्यापारी महासंघ, युनायटेड रिटेल ट्रेड गारमेंट असोसिएशन आणि पुणे सराफ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सलग तिसऱ्या वर्षी सुमारे तीन किलोमीटर परिसरात ही रोषणाई करण्यात आली आहे. बाजारपेठांमध्ये उत्साह निर्माण करण्यासोबतच पुण्याची सांस्कृतिक परंपरा नागरिकांसमोर आणणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
यावेळी नवल किशोर राम म्हणाले, “पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे. पारंपरिक बाजारपेठांचे महत्त्व आजही कायम आहे. युरोपमधील शहरांमध्येही लोक केवळ मॉलमध्ये खरेदी करण्याऐवजी शहरातील रस्त्यांवर फिरणे, सुंदर ठिकाणे पाहणे, खाद्यपदार्थांचा आनंद घेणे आणि स्थानिक दुकानांमधून खरेदी करणे पसंत करतात. पुण्यातही अशा प्रकारच्या संस्कृतीला मोठा वाव आहे.”
पुण्यात गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाप्रमाणेच दिवाळीलाही विशेष महत्त्व आहे. सणाच्या काळात बाजारपेठांमध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी व्यापारी संघटनांनी एकत्र येऊन केलेली ही रोषणाई शहराच्या उत्सवी वातावरणात भर घालत आहे. व्यापारी संघटनांचे योगदान केवळ अशा उपक्रमांपुरते मर्यादित नसून, शहरावर संकट आले किंवा मदतीची गरज भासली तरी व्यापारी नेहमीच पुढाकार घेतात, असेही राम यांनी सांगितले.
युनायटेड रिटेल ट्रेड गारमेंट असोसिएशनचे सचिव मिलिंद शालगर म्हणाले, “पुण्याला मोठी सांस्कृतिक परंपरा लाभली आहे. तिच्या जतनासाठी व्यापारीही सहभागी होतात. दिवाळीत बाजारपेठांमधील उत्साह वाढावा आणि नागरिकांना खरेदीचा आनंददायी अनुभव मिळावा, यासाठी व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन दरवर्षी विद्युत रोषणाई करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाची सुरुवात पुण्यात झाली असून, आता इतर शहरांमध्येही त्याचे अनुकरण होत आहे.”





