दावडी, (वार्ताहर)- खेड येथील भामा भीमा फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या महिला बचत गटातील सुवर्णा संतोष बोंबले पाटील यांना चंबळ फर्टीलायझर अँड केमिकल्स लिमिटेडकडून ड्रोन फवारणी यंत्राचे पायलट म्हणून ग्वाल्हेर, मध्यप्रदेश येथे दहा दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले व त्यांचे यशस्वी ड्रोन पायलट म्हणून पुणे जिल्ह्यातून निवड झाली आहे.
केंद्र सरकारच्या विकसित भारत या योजनेतून महिलांना सशक्त आणि आत्मनिर्भर बनविण्यासाठी केंद्र सरकारने ड्रोन दीदी ही योजना सुरू केली आहे. या ड्रोन दीदी योजनेतून चंबळ फर्टीलायझर अँड केमिकल्स या कंपनीचे विपणन विभागाचे उपव्यवस्थापक समाधान काळे यांच्या हस्ते ड्रोन फवारणी यंत्र सुवर्णा बोंबले यांना वितरित करण्यात आले. या ड्रोन फवारणी यंत्रामुळे कमी वेळेमध्ये जास्त क्षेत्र फवारणी होणार असून वेळेची बचत औषधाची बचत व अचूक फवारणी देखील होणार आहे.
खेड तालुक्यातील पश्चिम भागात खरीप हंगामामध्ये बटाटा, भात व सोयाबीन ही मुख्य पिके आहे व पावसाळ्यामध्ये खूप कमी वेळ फवारणीसाठी मिळतो तसेच चिखल असल्याने शेतामध्ये जाणे शक्य होत नाही अशावेळी ड्रोन फवारणी यंत्राचा खूप उपयोग होणार आहे.
ड्रोन फवारणी यंत्राचे वितरण प्रसंगी भामा भीमा फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष अनिल कदम, संचालक संतोष बोंबले पाटील, सी.ई.ओ. अतुल डेरे तसेच बचत गटातील महिला उपस्थित होत्या.