Suraj Chavan vs Chava Sanghatana : कोकाटेंच्या रमी डावाचा लाथा-बुक्क्यांनी शेवट, लातूरमध्ये नेमकं काय घडलं? वाचा A टू Z स्टोरी

लातूर : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजवणारी घटना लातूरमध्ये घडली आहे. विधान परिषदेत ऑनलाइन रमी खेळताना दिसलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या मारहाणीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांच्यासह कार्यकर्त्यांना कोपर आणि बुक्क्यांनी मारहाण केली. हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
माणिकराव कोकाटेंचा रमी व्हिडीओ वादाचं मूळ कारण
नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा ऑनलाइन जंगली रमी खेळतानाचा व्हिडीओ राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर शेअर केला. राज्यात शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरू असताना आणि शेतीचे प्रश्न प्रलंबित असताना कृषिमंत्री सभागृहात रमी खेळत असल्याचा आरोप करत रोहित पवार यांनी कोकाटे यांच्यावर टीकास्त्र सोडलं.
यामुळे विरोधकांनी कोकाटेंवर हल्लाबोल केला, तर छावा संघटनेने त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. मात्र, हा व्हिडीओ संदर्भाबाहेर काढला गेला असून, ते फक्त युट्यूबवर अधिवेशन पाहत असताना जंगली रमीची जाहिरात आली होती, असा खुलासा कोकाटे यांनी केला आहे.
लातूरमध्ये नेमकं काय घडलं?
20 जुलै रोजी लातूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे कार्यकर्ता मेळाव्यासाठी आले होते. त्यांच्या पत्रकार परिषदेनंतर अखिल भारतीय छावा संघटनेचे काही पदाधिकारी तिथे पोहोचले आणि माणिकराव कोकाटे यांच्या रमी खेळण्याच्या कृत्याबाबत निषेध नोंदवत राजीनाम्याची मागणी केली.
यावेळी त्यांनी तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकले, ज्यामुळे वातावरण तणावपूर्ण झालं. यानंतर राष्ट्रवादी आणि छावा संघटनेचे कार्यकर्ते भिडले. सूरज चव्हाण यांनी विजय घाडगे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यामुळे लातूरसह संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे.
लातूर बंदची हाक
या मारहाणीच्या निषेधार्थ छावा संघटनेने आज (21 जुलै) लातूर बंदची हाक दिली आहे. सूरज चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल होईपर्यंत आणि त्यांच्यावर कठोर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा विजय घाडगे यांनी दिला आहे. येत्या दोन दिवसांत लातूर जिल्हा बंदचं आयोजन करण्यात येणार असून, सर्वपक्षीय समर्थन मिळाल्याचा दावा छावा संघटनेने केला आहे.
सूरज चव्हाण यांचं प्रत्युत्तर
मारहाणीच्या घटनेनंतर सूरज चव्हाण यांनी आपली बाजू मांडली. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी असंवैधानिक भाषा वापरली आणि सुनील तटकरे यांच्यावर पत्ते फेकले, ज्यामुळे परिस्थिती चिघळली, असं त्यांचं म्हणणं आहे. “सत्तेत असलो तरी आम्ही चुकीचं काही करत नाही. पण कोणी आमच्या नेत्यांवर खालच्या पातळीवर बोललं, तर जशास तसं उत्तर दिलं जाईल,” असं सूरज चव्हाण यांनी ठणकावलं आहे.
विजय घाडगे यांचा संताप
छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांनी या मारहाणीला शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक असल्याचं म्हटलं आहे. “ही वैयक्तिक मागणी नव्हती, तर निष्क्रिय कृषिमंत्र्यांना हटवण्याची मागणी होती. जर ही मागणी चुकीची असेल, तर ही अत्यंत वाईट घटना आहे,” असं घाडगे म्हणाले.
विजय घाडगे यांनी राष्ट्रवादीच्या सत्तेच्या मस्तीला छावा स्टाईलने उत्तर देण्याचा इशारा देत अजित पवारांना थेट आव्हान दिलं. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी घाडगे यांना फोन करून पाठिंबा दर्शवला आहे.
सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या घटनेचं समर्थन न करता ती चुकीची असल्याचं म्हटलं आहे. “नेमकं काय झालं याची माहिती घेतोय, पण अशा घटना समर्थनीय नाहीत,” असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
रमेश केरे यांची मागणी
अखिल भारतीय स्वाभिमानी छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रमेश केरे पाटील यांनी या मारहाणीचा तीव्र निषेध केला. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सूरज चव्हाण यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली. “छावा स्टाईलने उत्तर दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही,” असंही केरे यांनी ठणकावलं.
कोण आहे सूरज चव्हाण?
– राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष
– अजित पवारांचे निकटवर्तीय
– लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ येथील रहिवासी
– 2019 मध्ये अजित पवारांनी पहाटेच्या शपथविधीवेळी आमदारांना परत आणण्यात महत्त्वाची भूमिका
– पक्षफुटीदरम्यान अजित पवारांसोबत गेलेल्या पहिल्या 10 नेत्यांपैकी एक
विरोधकांचा महायुतीवर जोरदार हल्लाबोल
या घटनेमुळे विरोधकांनी सत्ताधारी महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादी (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि सुप्रिया सुळे यांनी कोकाटे यांच्या कृत्यावर आणि मारहाणीच्या घटनेवर तीव्र टीका केली. “शेतकरी संकटात असताना मंत्री रमी खेळतात आणि मागणी करणाऱ्या कार्यकर्त्यांना मारहाण होते, हे लोकशाहीचं अपमान आहे,” असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
लातूरमधील या मारहाणीच्या घटनेने महाराष्ट्राच्या राजकारणातील वाढता हिंसाचार आणि असहिष्णुता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. आता प्रशासन आणि सत्ताधारी पक्ष या प्रकरणावर काय कारवाई करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
“#जंगली_रमी_पे_आओ_ना_महाराज…!”
सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी.
रस्ता भरकटलेल्या… pic.twitter.com/52jz7eTAtq
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 20, 2025
“#जंगली_रमी_पे_आओ_ना_महाराज…!”
सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी.
रस्ता भरकटलेल्या… pic.twitter.com/52jz7eTAtq
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 20, 2025





