Suraj Chavan : पार्थ पवार यांच्या काँग्रेसविषयीच्या एका वक्तव्यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेसच्या महाराष्ट्रातील डाऊनफॅालची सुरूवात असल्याची टिप्पणी पार्थ पवार यांनी केली होती. यावरुन काँग्रेसमधून तीव्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशातच काँग्रेसच्या टीकेला राष्ट्रवादीकडून पहिला पलटवार करण्यात आला आहे. पार्थ पवार यांच्या काँग्रेस पक्षाच्या वक्तव्याला महाराष्ट्र काँग्रेसने सोशल मीडिया एक्सवरुन नाव न घेता ट्विट करुन प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर काँग्रेसच्या नाना पटोले यांनी देखील प्रतिक्रिया दिली. ते वेळ सांगेल, कोणाचा डाऊनफॉल होईल ते वेळच सांगेल, असे पटोले म्हणाले. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे महाराष्ट्र सरचिटणीस सुरज चव्हाण यांनी काँग्रेससह राहुल गांधींवरती जोरदार टीका केली आहे. काँग्रेसने ती परंपरा पाळली नाही : सूरज चव्हाण आमच्या नेत्यावर टीका करण्यापेक्षा राहुल गांधी यांनी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत काय केलं ते आधी काँग्रेसने पहावं. महाराष्ट्राची परंपरा आहे, निधनानंतर त्याच घरातील व्यक्ती पोटनिवडणुकीत लढत असेल तर बिनविरोध करणे. मात्र काँग्रेसने ती परंपरा पाळली नाही, राजकीय परंपरेला छेद देण्याचा काम काँग्रेसने केलेले आहे, अशा शब्दांत सूरज चव्हाण यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने उमेदवार देणार नसल्याचे जाहीर केले. मात्र, काँग्रेस पक्षाने बारामती पोटनिवडणुकीत उमेदवार जाहीर केला. सुनेत्रा पवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी फोनद्वारे संवाद साधत पाठिंबा देण्याची मागणी केली होती. पार्थ पवार यांचं वक्तव्य मात्र, तरीही काँग्रेसने उमेदवार दिल्याने विविध राजकीय प्रतिक्रिया समोर आल्या. पार्थ पवार यांनी यावर भाष्य करताना काँग्रेसविषयी वक्तव्य केले. ते म्हणाले. लोक विसरत नाहीत. जे दादांचं प्रेम आहे लोकांच्या मनात, अशावेळी एवढ्या मॅच्युअर पार्टीने हा निर्णय घेणे, जिथे एवढे मोठे नेते आहेत, अतिशय चुकीचं आहे. मला वाटतं की आपण कोणाला थांबवू शकत नाही. जशी वेळ येते तसं सामोरं जावं लागतं. आम्ही सामोरं जाऊ, आम्ही काही कुणाला फोन करणार नाही, जे काही नशिबात लिहिलं आहे, ते बघू काय व्हायचंय ते. फक्त मला वाईट वाटतंय की काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल आहे, असे वक्तव्य पार्थ पवार यांनी केले होते. हेही वाचा : AA22xA6 Poster: रहस्यमय पोस्टरने वाढवली उत्सुकता; अल्लू अर्जुन देणार वाढदिवशी मोठी भेट!