Pune : नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडवा; खासदार सुप्रिया सुळे यांची विविध प्रश्नांवर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

पुणे -नागरिकांचे रस्ते, भूसंपादन मोबदला, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान भरपाई, पाणीपुरवठा योजना, शेतरस्ते, सिंचनासाठी पाणी आदी मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित विभागांनी प्राधान्याने कार्यवाही करावी, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत बारामती लोकसभा मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या, अडीअडचणींच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. यावेळी जिल्ह्याचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पुणे बाह्यवळण रस्त्याच्या अनुषंगाने नागरिकांना जास्तीत जास्त मोबदला मिळावा यादृष्टीने २०१३ च्या भूमिसंपादन कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येत आहे. ही मोबदल्याची प्रकरणे गतीने निकाली निघतील, यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
हवेली, मुळशी, वेल्हा आदी तालुक्यातील दरडग्रस्त व नैसर्गिक आपत्तीग्रस्त गावे, वस्त्या, पाड्यांचे भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले असून आवश्यक तेथे पुनर्वसन, अन्य उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच हवेली तालुक्यातील जांभले या खडकवासला धरणाच्या पाणलोटक्षेत्रात असलेल्या गावातील नागरिकांना व शालेय मुलांना प्रवासासाठी बोट मिळावी या मागणीच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाहीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.





