विश्रांतवाडी : कोरोनाच्या रुग्णांची सेवा करणाऱ्या नायडू हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्स, सुरक्षारक्षक व इतर कर्मचारी यांच्यासाठी छावा संघटनेच्यावतीने मोफत रिक्षा सेवा सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमाचा शुभारंभ महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आला. “सेवा परमो धर्म” या उद्देशाने सुरू केलेल्या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या उपक्रमाअंतर्गत कर्मचाऱ्यांना घरातून हॉस्पिटलमध्ये व पुन्हा घरी जाण्यासाठी दोन रिक्षा २४ तास उपलब्ध असणार आहेत.
या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी आयोजक छावा संघटनेचे प्रमुख धनंजय जाधव, गणेश सोनवणे, अविनाश सूर्यवंशी, द्वारकेश जाधव, रिक्षाचालक आकाश कसबे व विशाल टकले, डॉक्टर, नर्सेस उपस्थित होते. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनामार्फत आहोरात्र अथक परिश्रम घेतले जात आहेत. राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गर्दी टाळण्यासाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व दुकाने, खासगी कंपन्या, कार्यालये बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे सर्वत्र वर्दळ कमी होऊन रस्ते सामसूम असल्याचे चित्र पहायला मिळते.
मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील नायडू हॉस्पिटलमधील डॉक्टर्स, नर्सेस, सफाई कर्मचारी, सुरक्षारक्षक व इतर कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण पडत आहे. तरी देखील हे सर्व कर्मचारी अगदी जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडत आहेत. यातील बहुतांश कर्मचाऱ्यांकडे स्वतःचे वाहन नसल्याने रिक्षा अथवा बसमधून प्रवास करावा लागतो. मात्र सध्या कोरोनाचा संसर्ग होईल या भीतीने नायडू हॉस्पिटलमधून प्रवासी घेऊन जाण्यासाठी रिक्षावाले किंवा इतर वाहनचालक तयार होत नाहीत. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना खूप मनस्ताप सहन करावा लागत आहे. ही बाब छावा संघटनेचे प्रमुख धनंजय जाधव यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी संघटनेच्या माध्यमातून नायडू हॉस्पिटलमधील सर्व कर्मचाऱ्यांसाठी २४ तास मोफत रिक्षा सेवा सुरू केली आहे.
या उपक्रमाअंतर्गत नायडू हॉस्पिटलचे कर्मचारी ओळखपत्र दाखवून आपल्या घरापासून हॉस्पिटल किंवा हॉस्पिटलपासून घरी असा प्रवास मोफत करू शकतात.आजपासून या उपक्रमाची सुरूवात करण्यात आल्याचे धनंजय जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले.