भोपाळ – मध्य प्रदेशच्या हरदामध्ये विवाहित तरूणाने गळफास लावून आत्महत्या केली. सतीश बिझाडे (वय 35) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी त्याने पत्नीला व्हॉट्सऍपवर मेसेज केला होता. त्यामध्ये त्याने ‘मी चाललोय, तू नीट राहा. नोकरी असलेल्या व्यक्तीशी दुसरं लग्न कर,’ असे लिहिले होते. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हरदामध्ये राहणाऱ्या सतीश बिझाडेचा जून 2020 मध्ये समोता तिलवारी हिच्याशी विवाह झाला होता. समोता वन विभागात वनरक्षक पदावर कार्यरत आहे. सतीशने बीटेक केले आहे. मात्र त्याला नोकरी नव्हती. लग्नानंतर काही दिवसांनी दोघांमध्ये वाद सुरू झाले. दोघांनी घटस्फोटासाठी अर्जही केला होता.
दरम्यान, 15 एप्रिलला समोता कामासाठी रहटगावला गेली. सतीश हरदा येथे होता. समोता शनिवारी माहेरी थांबली होती. त्याच रात्री 1 वाजता सतीशने समोताला ‘मी चाललोय, तू नीट राहा. नोकरी असलेल्या व्यक्तीशी दुसरं लग्न कर,’ असा मेसेज व्हॉट्स ऍपवर पाठवला होता. समोताने तो मेसेज सकाळी वाचला. तीने लगेचच सतीशला कॉल केले. मात्र प्रतिसाद मिळाला नाही.
हरदा येथे येऊन पाहिले असता सतीशचा मृतदेह आढळून आला. त्याने गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येच्या ठिकाणी पोलिसांना दोन पानांची सुसाईट नोट सापडली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.