सदावर्ते अन् शिंदेंच्या सेनेत तुफान राडा, हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल; वादाचं कारण काय?

मुंबई : मुंबईतील एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बुधवारी (१५ ऑक्टोबर) मोठी धक्कादायक घटना घडली. वकील गुणरत्न सदावर्ते यांचा गट आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणात दोन्ही गटांकडून आरोप-प्रत्यारोप होत आहेत.
एसटी बँक ही माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या ताब्यात असलेली एशियातील सर्वात मोठी सहकारी बँक मानली जाते, जी एसटी कर्मचाऱ्यांच्या कष्टाने उभी राहिली. मात्र, गेल्या काही वर्षांत राजकीय गटबाजीमुळे बँकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. २०२३ मध्ये सदावर्ते यांच्या पॅनलने बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत विजय मिळवला, ज्यामुळे शिंदे गट आणि सदावर्ते गट यांच्यातील वाद सुरू झाला.
गेल्या दोन वर्षांत अशा बाचाबाच्यांचे अनेक प्रकार घडले आहेत. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी बँकेच्या संचालक मंडळाची हकालपट्टी करण्याची मागणी केली होती, पण राजकीय हस्तक्षेपामुळे ती पूर्ण झाली नाही.
नेमकं काय घडलं?
बुधवारी मुंबईतील बँकेच्या कार्यालयात संचालक मंडळाची बैठक आयोजित केली गेली. सदावर्ते गट आणि शिंदे गटाच्या पॅनलचे सर्व संचालक उपस्थित होते. बैठकीत दोन्ही गटांनी एकमेकांवर भ्रष्टाचार आणि निधी गैरवापराचे आरोप केले. सदावर्ते गटाच्या एका व्यक्तीने बँकेच्या महिला कर्मचाऱ्यांशी अश्लील वर्तन केल्याचा आरोप शिंदे गटाने केला.
या आरोपांमुळे उग्र झालेल्या सदावर्ते गटाच्या सदस्याने माजी संचालक आनंदराव अडसूळ यांच्या दिशेने पाण्याची बॉटल फेकली. यानंतर दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक शिवीगाळ सुरू झाली. त्यानंतर मारहाणीत त्याचे रूपांतर झाले. या घटनेची माहिती मिळताच परिस्थिती तणावपूर्ण झाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि दोन्ही गटांना शांत केले. हाणामारीनंतर शिंदे गटाचे कार्यकर्ते आधीच पोलिस ठाण्यात पोहोचले, तर सदावर्ते गटाचेही सदस्य तिथे दाखल झाले.





