Eknath Shinde : महायुतीत दंगा नको, एकनाथ शिंदेंचा धंगेकरांना कडक आदेश, पुण्यातील गुन्हेगारीवरही मोठं विधान

पुणे : महायुतीमध्ये दंगा नको असे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना सांगितले आहे, त्यांच्याशी माझे बोलणे झाले आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली. ते एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आले होते.
मुलीबाळी, नागरिकांना निर्भयपणे फिरता आले पाहिजे
धंगेकर हे मित्रपक्षात आहेत हे विसरले आहेत. त्यांच्या नेत्यांकडे त्यांची तक्रार करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, यावर शिंदे यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे. सर्वसामान्य जनतेवर कोणताही अन्याय झाला नाही पाहिजे. पुण्यामध्ये मुलीबाळी, नागरिकांना निर्भयपणे फिरता आले पाहिजे, गुन्हेगारी मुक्त पुणे असावे हे धंगेकरांचे म्हणणे होते, तसे स्पष्टीकरण आपल्याला धंगेकरांनी दिले आहे, असेही शिंदे यांनी नमूद केले.
गुन्हेगाराला पाठिशी घालणार नाही
मात्र गुन्हेगाराला क्षमा नाही. गुन्हेगार कोणीही असो त्याला पाठिशी घातले जाणार नाही. सरकार म्हणून कायदा सुव्यवस्थेचे रक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे. सर्वसामान्य जनतेला भय वाटता कामा नये. या विषयी आपली पोलीस आयुक्तांशीही चर्चा झाली आहे, असे शिंदे म्हणाले.
गुंडागर्दी, बळाचा वापर करतील त्यांच्यावर कडक कारवाई
पोलीस आयुक्तांनी पदभार घेतल्यानंतर गुन्हेगारांची परेड काढली होती, मात्र आता त्यांचा वचक राहिला नाही, असा अर्थ होतो का, असे विचारले असता, कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम पोलीस करत आहेत. मुख्यमंत्र्यांकडे गृहखाते आहे गृहविभाग सक्षमपणे काम करत आहे. जे गुंडागर्दी करतील, बळाचा वापर करतील, घाबरवण्याचे काम करतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, कोणालाही सोडले जाणार नाही असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
‘हा’ शब्द आम्ही पाळला
शेतकऱ्यांना महायुती सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही हे आम्ही सांगितले होते. तो शब्द आम्ही पाळला आहे. मुख्यमंत्री स्वत: मी आणि अजितदादा आम्ही निर्णय घेतला आणि ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. दिवाळीपूर्वी ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जातील. आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही हा शब्द आम्ही पाळला आहे, असे शिंदे यांनी नमूद केले.





