मुंबई हातची गेली, की मग हंबरडा फोडा; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

छत्रपती संभाजीनगर : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी हंबरडा मोर्चा काढण्यात आला. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मुंबई महापालिका हातातून गेली की हंबरडा फोडा! जेव्हा सत्तेत होते तेव्हा काही केले नाही, आता शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आंदोलनाचा नैतिक अधिकारच नाही, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
शिंदे यांनी पुढे म्हटले, शेतकऱ्यांच्या आत्महत्याग्रस्त कुटुंबांना एक लाख रुपयांची मदत जाहीर करतात, पण प्रत्यक्षात रिकाम्या हाताने येतात. हंबरडा फोडायचा असेल तर मुंबई गेल्यानंतर फोडा! पूर्वी कोणी बरोबर राहिले नाही तेव्हाही तुम्ही फोडलं होतं. या टीकेमुळे राजकीय वातावरण तापलं असून, पालकमंत्री संजय शिरसाट आणि खासदार संदीपान भुमरे यांनीही ठाकरे यांच्या कार्यशैलीवर टोला लगावला.
मुंबईतील ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या स्वागताच्या पोस्टरांबाबतही शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. पाहुण्यांचे स्वागत ही आपली परंपरा आहे. मुंबईत येणाऱ्यांचे आम्ही स्वागत करतो. पण काहींना जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी दिसतं. आम्ही मुंबईतील रस्ते सिमेंटकॉंक्रीटचे केले, जेव्हा तुमच्याकडे होते तेव्हा रस्त्यात खड्डे होते, असे शिंदे यांनी सांगितले.
खासदार भुमरे म्हणाले, अडीच वर्षांच्या मावळा सरकारमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आम्हाला भेटतच नव्हते. ऑनलाइन हजेरी लावायचे आणि ‘वर्षा’ बंगल्यावर कोणीच येऊ देत नव्हते. आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर सामान्य शिवसैनिकही भेटतो. समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट आणि आमदार रमेश बोरनारे यांनीही भाषणे केली.
महायुतीतील अंतर्गत तक्रारींवर शिंदे यांनी शांतता राखली. आमदार बोरनारे यांनी विधानसभा निवडणुकीत विरोधक आता भाजपमध्ये गेल्याबद्दल तक्रार केली. डॉ. दिनेश परदेशी हे बोरनारे यांच्या विरोधात उमेदवार होते, आता ते वैजापूर नगरपालिकेत पुन्हा नगराध्यक्ष होण्याच्या तयारीत आहेत. शिरसाट यांनीही यावर तक्रार केली. काही जण महायुतीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना समज द्यायला हवी. महायुतीच एकत्र निवडणूक लढवेल. कार्यकर्त्यांचा सन्मान आम्ही घेऊ, असे शिंदे यांनी आश्वासन दिले.





