पुणे – करोना संकटाच्या काळात गणेशोत्सवात महत्त्वाच्या ठरलेल्या फिरत्या विसर्जन हौदांकडे 2022 च्या गणेशोत्सवातच पुणेकरांनी पाठ फिरविली होती. या हौदांमध्ये एकूण विसर्जित झालेल्या मूर्तींपैकी केवळ 13 टक्केच मूर्तींचे विसर्जन झाले होते. त्यामुळे या वर्षी या विसर्जन हौदांची गरज नसतानाही महापालिका प्रशासनाने हट्ट करून यंदाही दीड कोटींच्या फिरत्या विसर्जन हौदांच्या निविदा काढल्या आहेत. तर यंदाही या हैदात केवळ 10 टक्केच मूर्ती विसर्जित झाल्या आहेत.
त्यामुळे, या हौदांवर यंदाही दीड कोटींचा चुराडा होणार गेल्या दोन वर्षांत पुणेकरांच्या तीन कोटींची उधळपट्टी करण्याची प्रशासनाची हौस पूर्ण झाली असेल तर पुढच्या वर्षी हे हौद नकोत, अशी मागणी सजग नागरिक मंचाने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे. तसेच या वर्षी केवळ सातव्या आणि नवव्या दिवसाचे विसर्जन मोठ्या प्रमाणात झाले असल्याने केवळ या दोनच दिवसांचे पैसे द्यावेत, अशी मागणीही संघटनेने केली आहे.
महापालिकेकडून यंदा या विसर्जन हौदांची निविदा काढण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, गणेशोत्सवाच्या सात दिवस आधी अचानक कोणाचीही मागणी नसताना या निविदा काढण्यात आल्या. त्यावर, सामाजिक कार्यकर्ते तसेच संघटनांनी आक्षेप घेतला होता. मात्र, त्यानंतरही प्रशासनाने या कामाची निविदा काढली होती.