लोणी काळभोर – पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आत्ममंथन मुळशी येथे आलेल्या अमेरिकन महिलेचे सहा हजार अमेरिकन डॉलर चोरल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला जेरबंद केले आहे. त्याच्याकडून डॉलर जप्त करण्यात आले असून न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित महिलेला ते डॉलर परत करण्यात आले आहेत.
या संदर्भात सविस्तर माहिती पौड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोज यादव यांनी दिली. याप्रकरणी आत्ममंथन मुळशी येथील सुरक्षा व्यवस्थापक भालचंद्र श्रीधर जाधव यांनी फिर्याद दाखल केली होती. या फिर्यादीनुसार तेथील एक कामगार विजयसिंग वीरेंद्र सिंग पटोई (रा. मुंबई, टिटवाळा) याला अटक करण्यात आली आहे. ही घटना 25 फेब्रुवारी 2023 रोजी घडली होती. भालचंद्र जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्याकडे बीबी जमीना करीम (रा. अमेरिका, न्यूयॉर्क, गयाना सिटी) नावाचे एक पाहुणे आले होते. त्यांचे 5943 अमेरिकन डॉलर चोरीला गेले आहेत. पोलीस निरीक्षक मनोज यादव यांनी तत्काळ त्या ठिकाणी भेट देऊन तपासपथक नेमून घटनेचा तपास करण्याच्या सूचना दिल्या. याठिकाणी कामास असलेला विजयसिंग वीरेंद्रसिंग पटोई ह्यास ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. त्याने चोरी केल्याची कबुली दिली. त्याला न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस कोठडी घेऊन ह्या घटनेचा तपास पूर्ण केला. 5943 अमेरिकेन डॉलर विजय पटोई ह्याच्याकडून हस्तगत करण्यात आले आहेत. 8 मार्च रोजी न्यायालयाने बीबी जमीना करीम यांना सदरचे डॉलर परत देण्याचे आदेश दिले असून त्यांना त्यांचे 5943 अमेरिकेन डॉलर परत करण्यात आले आहेत.