Stock Market: आज गुरुवारी शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह सुरू झाल्याचे पाहायला मिळाले. सकाळी 10 वाजण्याच्या दरम्यान सेन्सेक्स 601.28 अंकांनी घसरून 70,495.23 स्तरावर व्यवहार करत होता. तर निफ्टी 154 अंकांच्या घसरणीसह 21299 च्या पातळीवर व्यवहार करत होता. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी आयटीमध्ये घसरण दिसून आली. तर निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉल कॅप आणि निफ्टी बँक निर्देशांकात वाढ नोंदवण्यात आली.
आज शेअर बाजारात हिंदाल्कोच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर डॉ रेड्डीज, टाटा स्टील, एचसीएल टेकचे शेअर्स घसरणीसह उघडले. आयसीआयसीआय बँक आणि अॅक्सिस बँकेचे शेअर्स गुरुवारी सुरुवातीच्या व्यवहारात घसरले होते, तर एशियन पेंट्स आणि अदानी पोर्ट्समध्ये किंचित वाढ झाली. दुसरीकडे वेदांत, टाटा टेक, एसबीआय लाइफ आणि जेएसडब्ल्यू स्टीलच्या शेअर्सवर गुंतवणूकदार अधिक लक्ष ठेवून आहेत. कारण या कंपन्या चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहेत.
कोणत्या शेअर्समध्ये घसरण ?
सेन्सेक्स कंपन्यांमध्ये टेक महिंद्राचे शेअर्स सुमारे 4 टक्क्यांनी घसरले. काल कंपनीने डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले. या निकालात कंपनीचा निव्वळ नफा 60 टक्क्यांनी घसरून 510.4 कोटी रुपयांवर आला आहे. याशिवाय एचसीएल टेक्नॉलॉजीज, इन्फोसिस, विप्रो, अॅक्सिस बँक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि कोटक महिंद्रा बँकेचे शेअर्सही घसरणीसह व्यवहार करत आहेत. इंडसइंड बँक, एनटीपीसी, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत.
अदानी समूहाच्या सर्व 10 कंपन्यांचे शेअर्स तेजीसह व्यवहार करत होते. अदानी एनर्जी सोल्युशनचे शेअर्स दोन टक्क्यांनी वधारले तर अदानी टोटल गॅस किंचित वाढीसह व्यवहार करत होते. गुरुवारी आयसीआयसीआय बँक, ओएनजीसी, एचडीएफसी बँक, देवयानी, कामधेनू आणि ओम इन्फ्रा यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली आहे. दरम्यान या आठवड्यात या आठवड्यात सोमवारी राम मंदिरातील अभिषेक निमित्त बाजार बंद ठेवण्यात आला होता. त्याचबरोबर प्रजासत्ताक दिनानिमित्त उद्याही बाजारपेठ बंद राहणार आहे.