जळगाव – खान्देशात काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे. जळगाव जिल्ह्यातील काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील यांही त्यांच्यासोबत भाजपात प्रवेश करणार आहेत. याबाबत खुद्द डॉ. उल्हास पाटील यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना माहिती दिल्याचे समोर आले आहे. येत्या बुधवारी मुंबईत एका कार्यक्रमात ते भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. दरम्यान गेल्या आठवड्यात माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सोडून शिवसना शिंदे गटात प्रवेश केला होता.
मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडणार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत खुद्द डॉ. उल्हास पाटील यांनी जाहिररित्या दुजोरा दिल्याने त्यांचा भाजपामधील पक्ष प्रवेश निश्चित झाला आहे. डॉ. उल्हास पाटील गेल्या 30 वर्षांपासून जळगाव जिल्ह्यातील काँग्रेसचे एकनिष्ठ पदाधिकारी आहेत. जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसकडून निवडणुक लढविली होती.
1998 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचे सरकार कोसळल्यानंतर मध्यावधी निवडणुका झाल्या होत्या त्यावेळी डॉ. उल्हास पाटील हे काँग्रेसचे खासदार झाले होते. मात्र, हे सरकार 13 महिन्यांत कोसळले. 1999 मध्ये पुन्हा निवडणुका झाल्या. तेव्हा हा मतदारसंघ भाजपने पुन्हा आपल्याकडे खेचून आणला. तेव्हापासून आत्तापर्यंत या मतदारसंघात भाजपाचा खासदार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीत ही जागा काँग्रेसकडे असल्याने डॉ. पाटील येथूनच निवडणुकीची तयारी करीत होते.
पाटील कुटुंबाला उमेदवारी मिळण्याची शक्यता –
रावेर लोकसभा मतदारसंघात जळगाव जिल्ह्यामधील 5 आणि बुलढाणा जिल्ह्यामधील 1 (मलकापूर) असे एकूण 6 विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत. या मतदारसंघातून एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे खासदार आहेत. मात्र एकनाथ खडसेंनी भाजपला धक्का देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने रक्षा खडसेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे केतकी पाटील आणि उल्हास पाटील यांना भाजप पक्षात प्रवेश देऊन त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
24 जानेवारीला प्रवेश सोहळा –
डाॅ. उल्हास पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात विकास व प्रगती सुरु आहे. त्यांच्या या नेतृत्वावर विश्वासन ठेवून भाजपामध्ये कन्या डॉ. केतकी पाटील यांच्यासह प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी 24 जानेवारीला मुंबईत हा प्रवेश सोहळा होणार आहे, असे उल्हास पाटील यांनी सांगितले आहे. तसेच रावेर लोकसभा निवडणकीच्या उमेदवारीबाबत कुठलीही चर्चा झाली नूसन भाजपात प्रवेश केल्यानंतर त्याबाबत भाजपातील वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असेही डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले आहे.