कोलंबो – सरकारकडून आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी अथवा आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी लोक वेगवेगळ्या क्लुप्त्या करतात. कोणी पाण्याच्या टाकीवर चढतो तर कोणी इमारतीच्या कठड्यावर आता टॉवरवर. या क्लुप्तीची हमखास दखल घेतली जाते. फार पूर्वी शोले या चित्रपटात बसंतीशी लग्न करण्याची मागणी पूर्ण होण्यासाठी विरू पाण्याच्या टाकीवर चढला होता. त्यानंतर आता जेव्हाही असे आत्मघाताचा इशारा देणारे आंदोलन केल्यावर त्याला शोले स्टाइल आंदोलन म्हटले जाउ लागले आहे. सर्वसामान्यांचे ठीक. मात्र एखादे मंत्रीच आपल्या म्हणण्याकडे उंचावर जाउन बसत असतील तर?
श्रीलंकेत असा प्रकार घडला आहे. तिकडे नारळाची झाडे मुबलक असल्यामुळे येथे मंत्रालयात एक स्वतंत्र नारळ विभागाच असून अरूनदीका फर्नांडो हे या खात्याचे मंत्री आहेत. गेल्या काही काळात श्रीलंकेत नारळांची कमतरता भासू लागली आहे. मागणीच्या प्रमाणात असलेल्या या तुटवड्याकडे लक्ष वेधण्यासाठी फर्नांडो चक्क नारळाच्या झाडावरच चढले.
देशभरात नारळाची मागणी आणि उपलब्धता किती हा आपला संदेश देण्यासाठी त्यांनी नारळाच्या झाडाचाच आसरा घेतला आणि तेथे वर चढून आपला मुद्दा स्पष्ट केला. देशातल्या प्रत्येक उपलब्ध जागेवर नारळाचे झाड लावले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, मंत्री महोदयांच्या समर्थकांची मात्र या प्रकारात चांगलीच तारांबळ उडाली.