सिडनी : सध्या ऑस्ट्रेलियामध्ये T २० विश्वचषक सुरु आहे. जगभरातील खेळाडू यानिमित्तने ऑस्ट्रेलियात दाखल झालेले असताना श्रीलंकन खेळाडूंना मोठा धक्का बसलाय. श्रीलंकन टीमकडून विश्वचषक खेळण्यासाठी गेलेल्या दनुष्क गुणथिलकाला पोलिसांनी रविवारी पहाटे अटक केल्याची बातमी समोर आली आहे. या बातमीमुळे लंकन खेळाडूंना मोठा धक्का बसलाय.
शनिवारी श्रीलंकन टीमने इंग्लंड विरुद्ध सामना खेळाला. त्यानंतर गुणथिलका याला अटक करण्यात आल्याचे वृत्त ऑस्ट्रेलियन माध्यमांनी प्रसारित केले. गुणथिलकावर एका तरुणीने बलात्काराचे आरोप केले आहेत. आरोपानंतर गुणथिलकाशिवाय लंकन टीम मायदेशी परतल्याने देखील समोर आले.
सिडनी येथील एका २९ वर्षीय तरुणीने गुणथिलकावर बलात्काराचा आरोप केला आहे. गेल्या आठवड्यात डेटिंग ऍपवरून त्यांची भेट झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. तरुणीने आपल्याच घरात २ नोव्हेंबर रोजी लंकन खेळाडू गुणथिलकाने बलात्कार केल्याची तक्रार दिल्याची माहिती ऑस्ट्रेलियन माध्यमांनी दिली आहे. तीन आठवड्यापूर्वी दुखापत झाल्याने गुणथिलकाला संघाबाहेर बसावे लागले होते.गुणथिलकाने श्रीलंकेसाठी १०० हुन अधिक समाने खेळलेले आहेत. लंकन क्रिकेट बोर्डाकडून मात्र याबाबत कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही.