Smriti Mandhana : स्मृतीला होणाऱ्या पतीने मैदानातच मिठी मारत केलं अभिनंदन! विश्वचषक विजयानंतरचा VIDEO व्हायरल

Smriti Palash Video Viral : भारतीय महिला क्रिकेट संघाने २ नोव्हेंबर रोजी नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर इतिहास रचला. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ५२ धावांनी नमवून भारताने आयसीसी महिला वनडे विश्वचषक २०२५ चे पहिले जेतेपद पटकावले. या ऐतिहासिक विजयामुळे देशभरात उत्साहाचे वातावरण असले, तरी संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाच्या वैयक्तिक सेलिब्रेशनने सोशल मीडियावर खास लक्ष वेधून घेतले आहे.
तिचा बॉयफ्रेंड आणि प्रसिद्ध संगीतकार-चित्रपट दिग्दर्शक पलाश मुच्छलसोबतच्या रोमँटिक क्षणांनी चाहत्यांचे मन जिंकले असून, दोघांच्या लग्नाच्या चर्चांनाही या विजयामुळे अधिक रंग आला आहे.सामना संपताच, स्मृती मानधना थेट मैदानावर उपस्थित असलेल्या तिचा प्रियकर पलाश मुच्छलला भेटण्यासाठी धावली.
मैदानावर रंगले ‘वर्ल्ड चॅम्पियन’चे रोमँटिक सेलिब्रेशन –
View this post on Instagram
पलाशने तिला घट्ट मिठी मारून अभिनंदन केले. यानंतर पलाशने त्याच्या खांद्यावर असलेला तिरंगा झेंडा स्मृतीला दिला आणि नंतर तो झेंडा उघडून पसरवत ‘वर्ल्ड चॅम्पियन’ स्मृतीला त्यामध्ये गुंडाळले. आयसीसीने शेअर केलेल्या या हृदयस्पर्शी व्हिडीओमध्ये “मस्त वाटतंय,” असे म्हणत पलाशचा हसतमुख चेहरा दिसत आहे. हा व्हिडीओ चाहत्यांना प्रचंड आवडला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेही वाचा – हरमनप्रीत भांगडा करत आली अन्…; जय शाहांकडून ट्रॉफी स्वीकारताना केलेल्या ‘त्या’ कृतेचे होतयं कौतुक
पलाशच्या टॅटूने दिली प्रेमाची ग्वाही –
पलाश मुच्छलनेही इन्स्टाग्रामवर या अविस्मरणीय क्षणांचे दोन भावनिक फोटो शेअर केले. पहिल्या फोटोत स्मृती तिरंग्यात गुंडाळलेली आणि ट्रॉफी हातात धरलेली दिसत आहे, ज्यावर पलाशने ‘Am I Still Dreaming?’ (मला अजूनही स्वप्न पडतंय का?) असे कॅप्शन दिले. दुसऱ्या फोटोत हॉटेलमधील सेलिब्रेशन दिसत आहे, जिथे स्मृती खुर्चीवर बसलेली आहे आणि पलाश ट्रॉफी हातात धरून तिच्यासमोर उभा आहे. या फोटोत पलाशच्या हातावरील ‘SM18’ टॅटू स्पष्ट दिसतो. हा टॅटू ‘SM’ म्हणजेच स्मृती मानधना आणि ’18’ म्हणजेच तिचा जर्सी नंबर दर्शवतो, जो त्यांच्या अतूट प्रेमाची साक्ष देत आहे.
हेही वाचा – Indian Womens Team : विश्वविजेत्या भारतीय महिला संघाला BCCI कडून बक्षीस जाहीर! ICC पेक्षा जास्त देणार रक्कम
स्मृती लवकरच होणार इंदूरची सून –
स्मृती आणि पलाशची लव्हस्टोरी २०१९ पासून सुरू झाली असली, तरी त्यांनी २०२४मध्ये आपले नाते अधिकृत केले. या ऐतिहासिक विजयानंतर आता त्यांच्या लग्नाच्या चर्चांनीही जोर पकडला आहे. ‘आनंद बाजार पत्रिका’च्या अहवालानुसार, हे लग्न २० नोव्हेंबर २०२५ रोजी स्मृती राहत असलेल्या सांगली येथे होणार आहे. पलाशने नुकत्याच एका कार्यक्रमात लग्नाच्या बातमीला दुजोरा देत हसतमुखाने सांगितले होते की, “ती लवकरच इंदूरची सून होईल.”





