SIR Campaign: एसआयआर मोहिमेत बीएलओंपुढे पेच! चुकीच्या माहिती आधारे मतदाराचे नाव वगळल्यास कारवाई
SIR Campaign: विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत बीएलओंना प्रत्येक वगळलेल्या नावाची माहिती देणे बंधनकारक; चुकीच्या माहितीवर थेट कारवाईची टांगती तलवार.

SIR Campaign – मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत म्हणजेच एसआयआर प्रक्रियेत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (बीएलओ) मतदार यादी प्रसिद्ध होण्यापूर्वी नावे वगळलेल्या प्रत्येक मतदाराची माहिती द्यावी लागणार आहे. त्यामध्ये चुकीच्या माहितीच्या आधारे मतदारांचे नाव वगळले असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होणार आहे. त्यामुळे बीएलओंपुढे मोठा पेच निर्माण झा आहे.
प्रत्येक मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याला एका मतदान केंद्रावरील सुमारे ३०० ते २१०० मतदारांची पडताळणी आणि डिजिटायझेशन करायचे आहे. ही संख्या सरासरी १२०० ते १४०० इतकी आहे. शहरी भागात अनेक मतदार २००२ ते २०२५ या काळात विखुरले आहेत. त्यातील काही मृत, तर काही स्थलांतरीत झाले आहेत. त्यामुळे मतदार याद्यांमध्ये त्यांचे पत्ते अपूर्ण आहेत.
नव्याने मतदारसंघांत दाखल झालेले मतदार शेजाऱ्यांच्या ओळखीतील नाहीत, तसेच राजकीय पक्षांशीही संबंधित नाहीत. त्यातच त्यांचे मोबाइल क्रमांकही यादीत नसल्याने त्यांच्याशी संपर्क होत नाही. त्यातच काही जुने मतदार या अधिकाऱ्यांना सहकार्य करत नसल्याचा बीएलओंचा अनुभव आहे. त्यामुळे या मतदारांपर्यंत कसे पोचायचे, असा प्रश्न या बीएलओंपुढे निर्माण झाला आहे.
३५ अर्जांचे डिजिटायझेशन पूर्ण
जिल्ह्यात ९० लाख ८० हजार १७३ मतदार असून, या मोहिमेत प्रत्येक मतदाराला स्वतंत्र गणना अर्ज देण्याचे काम येत्या ८ ऑगस्टपर्यंत करायचे आहे. मात्र, मतदार यादीमधील पत्त्यांचा घोळ कायम असल्याने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आतापर्यंत केवळ ६० लाख ३९ हजार १२५ मतदारांनाच गणना अर्ज वाटप करू शकले आहेत. त्यातील ३५ लाख अर्जांचे डिजिटायझेशन पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक शाखेकडून देण्यात आली.
अशी आहे कार्यपद्धत
मृत मतदार असेल, तर मृत्यूचा दाखला, स्थलांतरीत असेल, तर मतदार यादीतील पत्त्यावर न आढळल्यास त्याचा तीन वेळा केलेला पंचनामा, अनुपस्थित मतदारांबाबतही पंचनामा आणि दुबार असलेल्या मतदारांचा दुसऱ्या मतदारसंघातील नावाचा पुरावा सादर केल्याशिवाय बीएलओंना त्यांचे काम पूर्ण करता येणार नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.






